Wednesday, 9 September 2026

*जालना जिल्ह्यात 1 हजार 16 कुणबी जात वैधता प्रमाणपत्र वाटप*


*- जिल्ह्यात आजपासून 62 विशेष शिबिरांचे आयोजन*

*- ग्रामपंचायतीमध्ये यादी जाहीर, नागरिकांनी यादी पाहून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन*

जालना, दि. 9 (जिमाका) : न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना झाल्यापासून जालना जिल्ह्यात आतापर्यंत 1016 कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यात 10 ते 17 सप्टेंबर, 2026 या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा एकूण ५ हजार २७ नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन गतीमान पद्धतीने काम करत असून उद्यापासून होणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी उपस्थित राहून प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून ही प्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्यासाठी जालना जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यात 10 ते 17 सप्टेंबर, 2026 या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबिरे होणार आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण 62 शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जालना तालुक्यात 10 शिबिर तर बदनापूर मध्ये 6, अंबड मध्ये 9, घनसावंगीमध्ये 8, परतूर मध्ये 6, मंठा मध्ये 6, भोकरदन मध्ये 11 आणि जाफराबाद मध्ये 6 असे एकूण 62 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 62 महसूल मंडळांमध्ये दि.10, 11, 12, 15 व 16 सप्टेंबर 2026 रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असून, त्यांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी तसेच उपलब्ध अभिलेखांच्या आधारे आवश्यक कार्यवाही करण्याचे काम महसूल विभागांकडून सुरू आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद व्हावी, तसेच पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत.

न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना झाल्यापासून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आजपर्यंत वैधतेसाठी एकूण 1664 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1016 कुणबी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे एकूण प्राप्त अर्जाच्या तुलनेत 98.62 टक्के प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आजपासून आयोजित केलेल्या शिबिराच्या माध्यमातून पात्र अर्जदारांनी आपली वैध कागदपत्रे सादर करुन जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावीत. याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. कुणबी जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विशेष शिबिरांमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment