जालना,दि.10(जिमाका)
: मध्यप्रदेशातील खांडवा येथील एका बालकाकडून कुटुंबाने
घेतलेल्या पैशांच्या उचलीच्या मोबदल्यात शेतीकाम करून घेतल्याचा प्रकार भोकरदन
तालुक्यातील चिंचोली येथे उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित शेतमालकाविरुद्ध
बालकामगार व बंधमजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,
बालकाची सुटका करून त्याला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी
चाइल्ड हेल्पलाइन १०९८, पुणे येथील नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार,
मध्यप्रदेशातील खांडवा येथील बालक आपल्या कुटुंबासह जालना जिल्ह्यातील चिंचोली
(ता. भोकरदन) येथील एका शेतमालकाच्या शेतात काम करीत असल्याची माहिती प्रशासनाला
मिळाली.
या गोपनीय माहितीची पडताळणी
केली असता, बालकाच्या वडिलांनी संबंधित शेतमालकाकडून ४० हजार रुपयांची उचल
घेतल्याचे समोर आले. त्यानंतर बालकाचे कुटुंब शेतात काम करीत होते. दरम्यान,
बालकाच्या वडिलांना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत ताब्यात
घेतल्यानंतर बालक व त्याची सावत्र आई शेतावर राहत होते.
दरम्यान, बालकाच्या आजीने
त्याचा ताबा मागितला असता, संबंधित शेतमालकाने बालकाच्या वडिलांनी घेतलेल्या
पैशांची परतफेड झाल्याशिवाय बालकाला सोडणार नसल्याचे सांगितल्याची माहिती पडताळणीत
समोर आली. तसेच बालकाकडून शेतीचे काम करून घेतले जात असल्याचेही निदर्शनास आले.
माहितीची गोपनीय पद्धतीने
पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शेतमालकाविरुद्ध
बालकामगार व बंधमजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बालकाची
सुटका करून त्याला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची शासकीय
मुलांच्या बालगृहात दाखल करण्यात आली आहे.
बालकाच्या पुनर्वसनाच्या
दृष्टीने त्याला त्याच्या मूळ गावी, हासुंड, खांडवा (मध्यप्रदेश) येथे पाठविण्याची
प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
******
No comments:
Post a Comment