*जालना जिल्ह्यातील इच्छुक पात्र व्यक्तींना 17 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी*
जालना,दि.10(जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जालना जिल्ह्यात सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी संसाधन व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींनी 17 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. राज्य नोडल एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी संसाधन व्यक्तींची नोंदणी करण्यात येत आहे.
या पदासाठी सर्व प्रकारच्या पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. तसेच अन्नप्रक्रिया प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. अन्नप्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान विकास, नवीन उत्पादन विकसित करणे, गुणवत्तेचे निकष, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आदी बाबींमध्ये सल्ला देण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मिळणार आहे. संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
लाभार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान उद्योगांचा विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक बाबी, उत्पादन विकास, अन्न सुरक्षा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि बँक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत पात्र वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल 10 लाख रुपये अनुदान मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अन्नप्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अर्ज कुठे करावा ?
इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बचत भवन, मोतीबाग समोर, जालना येथे 17 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावेत. योजनेची अधिक माहिती PMFMEच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment