जालना,दि.11(जिमाका): जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जिल्हा जनगणना हस्तपुस्तिका (District Census Handbook–D.C.H.B.) तयार करण्याचे काम पूर्ण झाल्याचे जिल्हा निवडणुक जनगणना अधिकारी यांनी कळविले आहे.
जनगणना 2027 अंतर्गत दि. 16 ऑगस्ट 2026 ते दि. 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात जिल्हा जनगणना हस्तपुस्तिका संकलनाचे काम करण्यात आले. या हस्तपुस्तिकेत जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात येतो. जनगणना हस्तपुस्तिका हे जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचे अधिकृत दस्तऐवजीकरण करणारे महत्त्वाचे साधन मानले जाते.
हस्तपुस्तिकेमध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या, भौगोलिक व सामाजिक वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन, विविध शासकीय योजना राबविणे तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. भारताच्या जनगणना कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात हे काम नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात आले असून, त्यासाठी जिल्ह्यातील एकूण 872 क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामात सहकार्य केले. यात ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी 10 सप्टेंबर, 2026 पर्यंत मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 964 गावांची तसेच 03 नगरपालिका आणि 05 नगरपंचायत क्षेत्रातील माहिती संकलीत करण्याचे 100 टक्के काम पूर्ण केले. जनगणना हस्तपुस्तिकेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरातील माहिती संकलित करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम केले. या माहितीच्या आधारे जिल्हा जनगणना हस्तपुस्तिकेचे काम पूर्ण करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment