जालना,दि.10(जिमाका) : माय भारत जालना, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार वश्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत यंग लीडर डायलॉग (VBYLD) क्विझ स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, जालना येथील मयूरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. विद्या पटवारी, जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे, प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र अहिरराव, उपप्राचार्य पूजा कक्कड, कार्यक्रम अधिकारी प्रा. पार्वती देशमुख तसेच डॉ. सुधाकर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. डॉ. विद्या पटवारी यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत यंग लीडर डायलॉग (VBYLD) उपक्रमाची माहिती दिली. देशाच्या विकास प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, युवकांमध्ये नेतृत्वगुण, ज्ञान, निर्णयक्षमता आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मयूरकुमार गोरमे यांनी स्पर्धेचे महत्त्व स्पष्ट करताना युवकांनी अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी आपल्या ज्ञानाचा, कौशल्यांचा आणि कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
क्विझ स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानासोबतच देशाच्या इतिहास, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि विकासविषयक बाबींच्या ज्ञानाला चालना मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
*****
No comments:
Post a Comment