जालना,दि.11(जिमाका):
महाराष्ट्राच्या
समृद्ध लोकसंगीत परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांच्या वतीने जालना येथे दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले
आहे. मंगळवार, दि. 15 सप्टेंबर आणि बुधवार, दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी सायं. 5.30 वाजता जे.ई.एस. महाविद्यालय,
जालना येथे हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाच्या
पहिल्या दिवशी, मंगळवार, दि. 15 सप्टेंबर रोजी विनल देशमुख, रमानंद उगळे, अश्विनी मिठे
आणि शाहीरा माधवी माळी यांच्या लोकसंगीत व लोककलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तर
बुधवार, दि. 16 सप्टेंबर रोजी श्रावणी महाजन, कुणाल वरळे, सानिका शिर्के आणि चेतन लोखंडे
हे कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांना लोकसंगीताची सुरेल अनुभूती देणार आहेत.
महाराष्ट्राच्या
ग्रामीण आणि लोकजीवनाशी घट्ट नाते असलेल्या लोकसंगीतामध्ये विविध भागांतील परंपरा,
बोलीभाषा, जीवनशैली, सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटते. या
समृद्ध लोकपरंपरेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नव्या पिढीला महाराष्ट्राच्या
लोकसंगीताची ओळख व्हावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सांस्कृतिक
उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता
मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.
किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध
लोककला, लोकसंगीत, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या महोत्सवासाठी
प्रवेश विनामूल्य असून जालना व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन
दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे
संचालक प्रशांत खेडकर यांनी केले आहे.
****

No comments:
Post a Comment