Wednesday, 23 September 2026

गणेश विसर्जनासाठी जालन्यात वाहतूक मार्गात बदल

 

25 सप्टेंबर रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश

 

   जालना,दि.23 (जिमाका) : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात दि. 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढण्यात येणार आहे. या काळात मिरवणुकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–टांगा स्टँड–सराफा बाजार–पाणीवेस–सुभाष चौक या मार्गावरून जुन्या जालन्याकडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पिटल, मंगल बाजार, चमन बाजार, राजमहल टॉकीजजवळील पुलावरून ग्लोबल गुरुकुल शाळेजवळून बायपास रोडने अंबड चौफुली, नूतन वसाहत मार्गे वळविण्यात येणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–बडीसडक–सराफा बाजार–जवाहर बाग चौकी–रहेमान गंज मार्गे जुना मोंढा या मार्गावरील वाहतूक शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता प्रवेशद्वार, जेईएस कॉलेज, बाबुराव काळे चौक, रहेमान गंज मार्गे वळविण्यात येणार आहे.

नवीन जालना–सदर बाजार परिसर–रहेमान गंज–मुर्गी तलाव परिसर–जवाहर बाग चौकी परिसरातील वाहतूक मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुन्या जालन्याकडे जाण्यासाठी जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिशटेकडी मार्गे वळविण्यात येणार आहे.

बसस्थानकाकडून येणारी वाहतूक सुभाष चौक, पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाताना बसस्थानक, दीपक वाईन शॉप, जुना मोंढा कमान, मुरगी तलाव, बाबुराव काळे चौक, जेईएस कॉलेज, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे वळविण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनकडून मंमादेवी मार्गे गांधी चमन व मंमादेवी मार्गे नवीन जालन्यात जाणारी वाहतूक नूतन वसाहत, अंबड चौफुली व मंठा चौफुली मार्गे वळविण्यात येणार आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगरकडून जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी वाहतूक ग्रेडर टी पॉइंट, राजूर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने वळविण्यात येणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. वरील आदेश दि. 25 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासुन श्रीगणेश विसर्जन होईपर्यंत अंमलात राहिल असे आवाहन करण्यात आले आहे.

 

****

No comments:

Post a Comment