Thursday, 17 September 2026

अपघातप्रवण स्थळांवरील सुरक्षा कामे तातडीने पूर्ण करा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणांना निर्देश

 


 

जालना(जिमाका),दि.17: जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांवरील (ब्लॅक स्पॉट) रस्ता सुरक्षा उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित यंत्रणांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि.16 रोजी आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर कोल्हे, सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यकारी विभाग 2 चे कार्यकारी अभियंता व्यं.ना. मिठ्ठेवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक निरिक्षक आ. अ. सोनवणे, विद्युत अभियंता के.बी. गावंडे, पोलीस निरिक्षक सुरेश उणवणे आदींची उपस्थिती होती.   

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणल्या की, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसावा, यासाठी आवश्यक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्यातील विविध ब्लॅक स्पॉटवर सुरू असलेल्या तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील 26 अपघातप्रवण स्थळांवर फ्लड लाईट बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 व 2 यांनी अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तातडीने सादर करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अपघातप्रवण ठिकाणांच्या परिसरातील विहिरींच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी विहिरींभोवती आवश्यक सुरक्षा उपाययोजनांसाठी अंदाजपत्रक तयार करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

स्पीड ब्रेकर, सूचना फलक बसविणे, विविध ठिकाणी नवीन स्पीड ब्रेकर बसविणे, खराब झालेले स्पीड ब्रेकर बदलणे, आवश्यक ठिकाणी नवीन स्पीड ब्रेकर उभारणे, रस्ता सुरक्षा सूचना फलक बदलणे आणि कॅट आय बसविण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एचवरील काजळा फाटा तसेच इतर अपघातप्रवण ठिकाणी कॅट आय, स्पीड ब्रेकर आणि आवश्यक रस्ता सुरक्षा साधने बसविण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

अंबड चौफुली, देऊळगाव राजा रोड, बदनापूर रोड, मोतीबाग बायपास आणि इंदेवाडी ते मंठा मार्गावरील रस्ता सुरक्षा उपाययोजनांवरही चर्चा झाली. आवश्यक ठिकाणी रम्बल स्ट्रिप, काँक्रीट बॅरिअर, स्पीड ब्रेकर तसेच दिशादर्शक व सूचना फलक बसविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

काही अपघातप्रवण ठिकाणी पथदिवे नसणे किंवा उपलब्ध प्रकाश व्यवस्था बंद असल्याने रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. विशेषतः इंद्रायणी हॉटेल, चंदनझीरा परिसरातील प्रकाश व्यवस्था आणि वीजपुरवठ्याच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तर काही ठिकाणी विद्युत विभागाच्या डीपी आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी असल्याने संबंधित यंत्रणांनी विद्युत विभागाशी समन्वय साधून स्वतंत्र डीपी उपलब्ध करून घेण्यासाठी कार्यवाही करावी, तसेच प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच काही ब्लॅक स्पॉटवरील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, वीज वितरण कंपनी आणि इतर संबंधित यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून रस्ता सुरक्षा उपाययोजनांची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.

मागील बैठकीत निर्देश देऊनही काही कामे अद्याप प्रलंबित असल्याचे आढळून आले. ही कामे तातडीने पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अंबड चौफुलीच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. चौफुली परिसरातील वाहतूक आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व अपघातप्रवण स्थळांवरील सुरक्षा उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. खराब सुरक्षा साधने बदलणे, प्रकाश व्यवस्था सुधारणे, योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर व रम्बल स्ट्रिप बसविणे, सूचना फलक आणि कॅट आय बसविणे तसेच विहिरींच्या ठिकाणी सुरक्षा उपाय करणे याबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment