जालना,दि.18(जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त
राज्य शासनाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात 17 सप्टेंबर
ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार
आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्या माध्यमातून
प्रलंबित प्रकरणांमधील त्रुटींची पूर्तता करून प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष
मोहीम राबविण्यात येत आहे.
सन
2026-27 मध्ये इयत्ता 11 वी, 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील
विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत. तसेच ज्या अर्जदारांच्या
प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे किंवा त्रुटींची पूर्तता झालेली नाही आणि प्रकरणे समितीकडे
प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांना या विशेष मोहिमेतून प्रकरणे निकाली काढण्याची संधी
देण्यात आली आहे.
या
कालावधीत कार्यालयात त्रुटी पूर्ततेसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जदारांनी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी,
असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग
(जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 मधील कलम 8
नुसार जातदावा सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर आहे. त्यामुळे अर्जदारांनी आपल्या
प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्रुटींची पूर्तता
न केल्यास संबंधित अर्ज निकाली काढण्यात येऊ शकतो. तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्र
देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2012 मधील नियम 17(2) व (3) नुसार
जात वैधता प्रमाणपत्राची गरज नसल्याचे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येऊ शकतो. त्यानंतर
कोणतेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समिती, जालना यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment