Wednesday, 16 September 2026

*कायदा-सुव्यवस्था व महसूल सुरक्षेसाठी जालना जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम*

 

*- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून ७२ हजार रुपयांचा दंड वसूल*


*- १३ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई*


जालना, दि.१६ (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे तसेच अवैध प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १२ या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महसूल विभागाच्या गौण खनिज शाखेमार्फत संयुक्त व स्वतंत्रपणे ही मोहीम राबविण्यात आली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने अंबड-सोलापूर-धुळे महामार्गावर विशेष तपासणी नाका उभारून २५ वाहनांची तपासणी केली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ७२ हजार रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. तपासणीदरम्यान ओव्हरलोड वाहतूक, फिटनेस दाखला नसणे, वाहनचालक परवाना नसणे आणि रिफ्लेक्टर नसणे आदी उल्लंघने आढळून आली. ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गांचे होणारे नुकसान आणि अपघातांचा धोका लक्षात घेता यापुढे ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे.


पोलीस विभागाकडून १३ जणांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

जालना जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ अन्वये सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, तर तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ अशा एकूण १३ व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची नोंद करण्यात आली. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांवर कठोर नजर ठेवण्यात येत असल्याचे पोलीस विभागाने कळविले आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महसूल विभागाच्या गौण खनिज शाखेच्या पथकांनी जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्यांतील प्रमुख रस्ते आणि तपासणी नाक्यांवर दिवसभर गस्त व तपासणी केली. या मोहिमेत अवैध दारू वाहतूक तसेच अवैध वाळू किंवा मुरूम उत्खननाचा कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांमुळे अवैध प्रवृत्तींना मोठा आळा बसला असल्याचे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करू नये. वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना व रिफ्लेक्टर अद्ययावत ठेवावेत. अवैध दारू, जुगार किंवा गौण खनिजांची अवैध वाहतूक अथवा उत्खनन निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे आणि शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


००००


No comments:

Post a Comment