जालना,दि.28(जिमाका):
जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील
सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी
केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या
समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री
नितेश राणे यांनी आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत
जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील राजेवाडी आणि सोमठाणा तलावांमधील पाणीसाठा,
मत्स्यव्यवसायाची स्थिती आणि मच्छीमारांचे झालेले नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.
मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्याने
दुष्काळाच्या संकटात मच्छिमारांपर्यंतही शासनाची मदत पोहोचविण्याची भूमिका असल्याचे
सांगत श्री. राणे म्हणाले की, तसेच स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला. बदनापुर तालुक्यातील
राजेवाडी आणि सोमठाणा तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम
झाला आहे. पाणीसाठा आणि मत्स्यव्यवसायावरील परिणामाचे मोजमाप करून पंचनामे करुन त्यानुसार
नियमानुसार मदत देण्याची केली जाणार असल्याचे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोमाठणा तलावातील पाण्याची
पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मत्स्यउत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम झाला
असून, गेल्यावर्षीच्या 79 टक्के मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन केवळ 20
टक्क्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
आहे.
या
पार्श्वभूमीवर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने
करण्यात यावी, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच
नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांनाही शासनाच्या माध्यमातून
आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तलावातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच
मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहितीही
यावेळी मच्छीमार बांधवांना देण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन उपलब्ध शासकीय
योजनांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
यावेळी आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश
मिसाळ, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दिक्षित, प्रादेशिक
आयुक्त, छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त मधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय
व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment