Thursday, 24 September 2026

विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान : ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’चा लाभ घेण्याचे सहायक संचालक अनंत कदम यांचे आवाहन

 

जालना दि.24(जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांची यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.

 

तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक

जालना तालुका : 27 सप्टेंबर रोजी शिकलगीर वस्ती, रामनगर, जालना येथे, तर 28 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, शिवनगर, जालना येथे शिबिर होणार आहे.

बदनापूर तालुका : 27 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, आन्वी येथे, 28 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, धामणगाव येथे, तर 29  सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, वसंतनगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबड तालुका : 27 सप्टेंबर रोजी नाथगोसावी वस्ती व बाबर वस्ती, अंबड येथे, तर 28 सप्टेंबर रोजी लोहार वस्ती व बंजारा वस्ती, शाहपूर येथे शिबिर होणार आहे.

घनसावंगी तालुका : 27 सप्टेंबर रोजी  भिल्लवस्ती, पारधी वस्ती, – घनसावंगी शहर, कैकाडी वस्ती मांदळा रोड, घनसावंगी, कैकाडी वस्ती भावनगर, घनसावंगी शहर  या परिसरातील संबंधित भटके-विमुक्त वस्त्यांमध्ये, 28 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, पारडगांव येथे, तर 29 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, रांजणी तसेच धनगर वस्ती, रांजणी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मंठा तालुका : 27 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, मंठा येथे, 28 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, मंठा येथे, तर 29 सप्टेंबर रोजी धनगर वस्ती, तळणी येथे शिबिर होणार आहे.

परतूर तालुका : 27 सप्टेंबर रोजी वडार वस्ती येथे, 28 सप्टेंबर रोजी शिकलकरी वस्ती, परतूर येथे, तर 29 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, आष्टी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भोकरदन तालुका : 27 सप्टेंबर रोजी नाथगोसावी वस्ती, भोकरदन, गोसावी समाज वस्ती फत्तेपूर (शिबीर नाथगोसावी येथे) भोकरदन परिसरात, 28 सप्टेंबर रोजी पारधी वस्ती व लबानवस्ती-  राजुर, परिसरात तर 29 सप्टेंबर रोजी तसेच बंजारा/ वस्ती, तपोवन, गोसावी वस्ती  - मोतीनगर  तपोवन परिसर येथे शिबिर होणार आहे.

जाफ्राबाद तालुका : 27 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, गोंधळी वस्ती व धनगर वस्ती, खासगांव येथे, 28 सप्टेंबर रोजी गोसावी वस्ती, माहोरा येथे, तर 29 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, जाफ्राबाद तसेच भोई वस्ती, जाफ्राबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिबिरापूर्वी वस्तीस्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment