जालना,दि.23 (जिमाका) : आगामी श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जालना
शहरातील घाणेवाडी तलाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी
शशिकांत हदगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक
आदेश जारी केला आहे.
श्री
गणेश विसर्जन 25 सप्टेंबर 2026 रोजी असल्याने काही गणेश मंडळांकडून घाणेवाडी तलावात
गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच घाणेवाडी तलावातून जालना
शहराला पाणीपुरवठा होत असल्याने तेथे श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यास संबंधित ग्रामस्थांकडून
विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त
केली आहे.
या
पार्श्वभूमीवर घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात
आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना
माहिती देऊन करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हा
आदेश 25 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 26 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री
12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात
येणार असल्याचे जालना जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment