जालना,दि.30 (जिमाका) : समाजातील अडचणी केवळ पाहून न थांबता, त्या दूर
करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजत असेल, तर
तीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची फलश्रुती ठरते. याच विचाराचा प्रत्यय जालना येथील
संस्कार प्रबोधिनी माध्यमिक शाळेच्या इयत्ता 8, 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून
घडवून आणला आहे.
जालना जिल्ह्यात निर्माण
झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून या विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त
ग्रामस्थांच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. आपल्या खाऊच्या पैशातून,
तसेच सुजाण नागरिक व वस्तीतील एका घरातून पाच रुपये,याप्रमाणे एका विद्यार्थ्याने
वीस घरे अशा 61 विद्यार्थ्यांनी हा निधी संकलित करून तसेच सामूहिक प्रयत्नांतून
विद्यार्थ्यांनी तब्बल 19 हजार 400 रुपयांचा निधी संकलित केला.संस्कार प्रबोधिनी
विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थ्यांनी या निधीतून प्रत्येकी 3 हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या
टाक्या खरेदी केल्या आणि त्या सिरसवाडी गावाला लोकहितार्थ भेट दिल्या.संस्कार
प्रबोधिनीविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,विजय देशमुख,विनायकराव देशपांडे, प्रा.केशर
सिंह ब गेरिया,भास्करराव काळे, मु.अ. ईश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम
राबवण्यात आला.
या दोन्ही पाण्याच्या टाक्या
गावातील मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या असून, त्यांचा उपयोग ग्रामस्थांना पाण्याचा
साठा करण्यासाठी आणि सामुदायिक गरजांसाठी होणार आहे. विशेष म्हणजे, दुष्काळाच्या
कठीण परिस्थितीत पाण्याच्या उपलब्धतेचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी केलेली ही
मदत ग्रामस्थांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाचे जिल्हाधिकारी अशिमा
मित्तल यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या वयाचा विचार न करता
सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवत मदतीसाठी दाखवलेली तत्परता ही अत्यंत प्रेरणादायी
असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकाने दुष्काळ निवारणासाठी
आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांचा हा उपक्रम इतर शाळा,
संस्था आणि नागरिकांसाठीही प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी तहसीलदार, जालना राजू
निहाल, ग्रामविकास अधिकारी गजानन सातपुते, कलेक्टर थिंक टँक फेलो सुप्रवीण पाखरे,
आकांक्षी जिल्हा फेलो साक्षी उगले, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच सिरसवाडी अर्जुन
ढगे पोलीस पाटील ग्राममहसूल अधिकारी मोहिते मंडळ अधिकारी कळकुंबे ग्रामपंचायत
कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कृतीतून
सामाजिक जबाबदारीचा मोठा संदेश!
आजच्या काळात विद्यार्थ्यांनी
केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजातील प्रश्न समजून घेणे,
संवेदनशीलता जपणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे
आहे. संस्कार प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा उपक्रम त्याचे उत्तम
उदाहरण आहे.
19,400 रुपयांचे योगदान, दोन
पाण्याच्या टाक्या आणि त्यामागे असलेली शेकडो विद्यार्थ्यांची संवेदनशील भावना! या
उपक्रमाचे खरे मोल केवळ आर्थिक मदतीत नसून, संकटाच्या काळात आपणही समाजासाठी
काहीतरी करू शकतो, या विचारात आहे.
विद्यार्थ्यांच्या
या कृतीतून समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो — दुष्काळावर मात करणे ही केवळ
शासनाची जबाबदारी नसून, शासन आणि समाज यांच्या सामूहिक सहभागातूनच हा लढा अधिक
प्रभावी होऊ शकतो.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment