Thursday, 15 October 2026

जालना शहरात 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल नवरात्रोत्सव व दसऱ्यानिमित्त वाहतूक नियोजन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

 


जालना,दि.15 (जिमाका) : नवरात्रोत्सव आणि दसरा सणानिमित्त जालना शहरातील बाजारपेठा व प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांची सुरक्षितता राखली जावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जालना शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी आदेश जारी केले आहेत.

नवरात्रोत्सव व दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर दि. 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12.01 वाजेपासून ते दि. 17 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संबंधित मार्गांवरील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढते. अशा वेळी अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 36 अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे. जालना शहरातून अंबडकडे जाणारी तसेच बीडकडून अंबडमार्गे येणारी अवजड वाहतूक निर्धारित पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

चार प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत बदल

जालना-अंबड-वडिगोद्री-शहागड मार्ग : या मार्गाने बीडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना जालना-गोलापांगरी-छत्रपती शिवाजी महाराज चौक-अंबड-पाचोड-वडिगोद्री-शहागड मार्गे बीडकडे जाता येणार आहे.

घनसावंगी-अंबड-जालना मार्ग : घनसावंगी येथून अंबडमार्गे जालन्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सुतगिरणी चौफुली-घनसावंगी-गुरुपिंपरी-राणी उंचेगाव फाटा-अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप चौक-गोलापांगरी मार्गे जालन्याकडे वळविण्यात येणार आहे.

घनसावंगी-अंबड-शहागड मार्ग : घनसावंगी येथून अंबडमार्गे शहागडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुतगिरणी चौफुली-घनसावंगी-तिर्थपुरी-सुखापुरी-वडिगोद्री मार्गे शहागडकडे जाण्याचा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

पाचोड-अंबड-घनसावंगी मार्ग : पाचोडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळील राणी उंचेगाव फाटा मार्गे घनसावंगीकडे वळविण्यात येणार आहे.

अवजड वाहनांच्या वाहतुकीतील हे बदल दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12.01 वाजेपासून दि. 17 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे ट्रक, मालवाहू वाहने आणि इतर अवजड वाहनांच्या चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

                                                               

No comments:

Post a Comment