Thursday, 8 October 2026

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सेवा संकल्प अभियानअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर







जालना,दि.8(जिमाका) : नागरिकांच्या विविध महसूलविषयक अडचणींचे स्थानिक पातळीवर निराकरण करण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उपक्रमांतर्गत महसुल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला.

जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतूर, घनसावंगी आणि अंबड या आठही तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल कार्यालयांमध्ये वारंवार ये-जा करावी लागू नये, तसेच त्यांच्या प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या शिबिरांमध्ये नागरिकांच्या विविध महसूलविषयक समस्या व अर्ज स्वीकारून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात आली. विविध दाखले, फेरफार नोंदी, जमीनविषयक प्रकरणे, वारस नोंदी तसेच महसूल विभागाशी संबंधित इतर कामांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या शिबिरामुळे महसूल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत झाली.

 

****


No comments:

Post a Comment