मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून जालना जिल्ह्यात 137 कर्ज
प्रस्तावांना मंजुरी
1300 प्रकरणांचे उद्दिष्ट; तरुणांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
जालना,दि.1 (जिमाका) : शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना उद्योग, व्यवसाय व
स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य
शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी
आतापर्यंत 137 कर्ज प्रस्तावांना बँकांकडून मंजुरी देण्यात आली आहे.
सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्यासाठी 780
कर्ज मंजुरी प्रस्ताव देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 569
कर्ज प्रस्ताव बँकांकडे शिफारस करण्यात आले असून, त्यातील 111 कर्ज प्रस्तावांना
बँकांनी मंजुरी दिली आहे. तसेच जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 247 कर्ज
प्रस्ताव बँकांकडे शिफारस करण्यात आले असून, त्यापैकी 26 कर्ज प्रस्तावांना मंजुरी
मिळाली आहे. अशा प्रकारे एकूण 137 कर्ज प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिली आहे.
सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1300
प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींनी योजनेच्या संकेतस्थळ : www.maha-cmegp.gov.in या
संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जास्तीत
जास्त अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेच्या संकेतस्थळावर प्राप्त
झालेल्या कर्ज प्रस्तावांना बँकांनी त्वरित कर्ज मंजुरी देऊन उद्दिष्टपूर्तीसाठी
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उपआयुक्त यो.रा. सारणीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment