Monday, 12 October 2026

जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना मिळणार कोरडा पोषण आहार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक वाटप





 

जालना,दि.12(जिमाका) : भारत सरकारच्या वर्ष 2030पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याच्या उद्दिष्टानुसार, 'प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना' अंतर्गत जालना जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या पुढाकाराने आणि एस.आर.जी. पित्ती स्टील यांच्या सीएसआर (CSR) निधीतून जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या 600 क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार किट पुरविण्यात आले आहेत.

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती हॉल आज रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 10 क्षयरुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. उर्वरित रुग्णांना या किटचे वाटप तालुकास्तरावरून केले जाणार आहे. यावेळी एस.आर.जी. पित्ती स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक मानस पित्ती, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष प्रशांत महाजन, रोटरी क्लब ऑफ जालनाच्या माजी अध्यक्षा वर्षा पित्ती, रोटरी क्लबचे सदस्य रमेश मगरे, चिराग तलरेजा आणि भारत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी. एम. कुडलीकर म्हणाले की, "प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत 'निक्क्षय मित्र' म्हणून नोंदणी करून रुग्णांना अतिरिक्त पोषण देण्याचा उपक्रम सुरू आहे. रोटरी क्लब आणि एस.आर.जी. पित्ती स्टील यांच्या सहकार्यामुळे रुग्णांना औषधांसोबतच उच्च प्रथिने असलेला पोषण आहार मिळत आहे, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर अतिशय सकारात्मक परिणाम होईल."

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत एस.आर.जी. पित्ती स्टील व रोटरी क्लब ऑफ जालना यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले, तसेच भविष्यातही असेच योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. रमेश काकड, डॉ. परशुराम नागदरवाड यांच्यासह राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील क्षयरुग्ण व त्यांचे नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

****

No comments:

Post a Comment