जालना,दि.12(जिमाका) : सेवा
संकल्प अभियान सप्ताह अंतर्गत् जाफ्राबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला
माहोरा येथे शाळा स्तरावर विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या अभियाच्या
माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजोपयोगी मूल्यांच्या
रुजवणुकीसाठी विविध कार्यक्रम पार पडले.
यामध्ये दि.26 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना
सेवा संकल्प अभियानाची पार्श्वभूमी सांगून सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये
दि.27 सप्टेंबर रोजी वृक्षारोपणाचे महत्त्व व गरज प्रतिपादन करून, देशी
प्रजातीचे वृक्ष तसेच विविध जैवविविधतेसाठी आवश्यक वनस्पती व औषधी वनस्पतींची लागवड
करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. दि.28 सप्टेंबर रोजी शाळा स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
करून क्रीडा क्षेत्रातील संधी व महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची
आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली. दि.29 सप्टेंबर रोजी 'माझ्या स्वप्नातील
भारत' आणि 'विकसित भारत २०४७' या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि.30 सप्टेंबर रोजी वर्गाच्या खोल्या,
कार्यालय व शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना श्रमदानाचे
महत्त्व पटवून देण्यात आले. दि. 1
आक्टोबर रोजी आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना
शालेय साहित्य, पुस्तके, वह्या व पेन पॅडचे वाटप करण्यात आले. आणि दि. 2 आक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करून 'सेवा संकल्प'
सप्ताहाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची
माहिती विद्यार्थी व पालकांना देऊन जनजागृती करण्यात आली.
शाळेचे
मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम उत्साहात पार
पडले.


No comments:
Post a Comment