जालना,दि.5(जिमाका) : जालना-वाटूर राष्ट्रीय महामार्गावरील विरेगाव आणि चितळपुतळी
फाटा परिसरात महामार्गाच्या हद्दीत करण्यात आलेली अतिक्रमणे प्रशासनाने हटविली. मा.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण मोहीम
राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, मोजपुरी पोलीस ठाणे तसेच कल्याण टोलवेजचे
अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, वाहनचालक व नागरिकांची
सुरक्षितता सुनिश्चित व्हावी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही
अतिक्रमणे हटविण्यात आली. कारवाईपूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नियमानुसार आवश्यक
सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने महामार्गाच्या हद्दीतील
अतिक्रमणे हटविण्यात आली.
या कारवाईमुळे जालना–वाटूर महामार्गावरील
वाहतुकीला अधिक मोकळीक मिळण्यास तसेच वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार
आहे. महामार्गाच्या हद्दीत अनधिकृत अतिक्रमण किंवा बांधकाम करू नये आणि सार्वजनिक वाहतूक
व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने
करण्यात आले आहे.







No comments:
Post a Comment