जालना,दि.5(जिमाका) : जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या
‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथील जिल्हा परिषद उच्च
प्राथमिक शाळा आणि आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले. किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, योग्य आहार, वैयक्तिक
स्वच्छता तसेच किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या
उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शिका प्रा. चारुलता पाटील, डॉ. नागरगोजे,
डी.एम. अंभोडा कदम, आरोग्य सेविका शुभांगी रतन रोटे आणि प्रा. सरवदे यांनी किशोरवयीन
मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून
मार्गदर्शकांशी संवाद साधला. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,
इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थिनी तसेच त्यांच्या माता मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी
सेविका व मदतनीस, आशा सेविका, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.
किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात
संपन्न झाला.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment