Tuesday, 6 October 2026

सेवा संकल्प अभियान : नशामुक्त भारताचा संदेश; अमृतच्या योजनांचे मार्गदर्शन

 



जालना,दि.6(जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि नवयुग नशामुक्ती केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘अमृत संस्थेच्या योजना व नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक, कौशल्यविकास आणि रोजगारक्षम योजनांची माहिती मिळावी, तसेच नशामुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. शिक्षणासोबत कौशल्यविकास आणि उद्योजकतेकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अमृतच्या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याला योग्य दिशा द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

नवयुग नशामुक्ती केंद्राचे समुपदेशक संजय थोरात यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले. नशेमुळे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती त्यांनी दिली. तरुणांनी नशेपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, तसेच इतरांमध्येही नशामुक्तीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विठ्ठल गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गोवर्धन खेडकर यांनी केले, तर आभार डॉ. दादासाहेब गिऱ्हे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**

No comments:

Post a Comment