Wednesday, 7 October 2026

*जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु*



जालना,दि.7 (जिमाका) : दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या फटाका विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. विस्फोटक नियम, 2008 मधील नियम 84 अन्वये सण व उत्सवांच्या कालावधीत तात्पुरत्या फटाका विक्रीचे परवाने देण्यात येतात.

यावर्षी तात्पुरता फटाका विक्री परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज 7 ते 31, ऑक्टोबर 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सर्व तात्पुरते फटाका विक्री परवाने कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहेत.

परवान्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. नूतनीकरणासाठी Form RE-1, तर नवीन परवान्यासाठी Form AE-5 मधील अर्ज आवश्यक आहे. याशिवाय परवानाधारकाचा फोटो, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा फोटो असलेला अन्य ओळख पुरावा, व्यवसाय कर अधिकाऱ्यांचे नादेय प्रमाणपत्र, जागेच्या मालकीची कागदपत्रे व जागा मालकाचे संमतीपत्र तसेच संबंधित महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.अफटाका विक्रीच्या ठिकाणी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार वाळूने भरलेली बादली, पुरेशा पाण्याची व्यवस्था आणि फायर एक्स्टिंग्विशर ठेवण्यात येणार असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्रही सादर करावे लागणार आहे.

नवीन परवानाधारकांनी संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यास जिल्हा कार्यालयामार्फत पत्र देण्यात येणार आहे. वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे परवाना व नूतनीकरण शुल्क GRAS प्रणालीतील चलनाद्वारे शासन खात्यात जमा केल्यानंतर परवाना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

****


No comments:

Post a Comment