जालना,दि.9(जिमाका) : जिल्ह्यातील शासकीय
कार्यालये स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने
विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘सेवा संकल्प अभियान
– सेवा माझे योगदान’ या मोहिमेंतर्गत दर आठवड्याच्या पहिल्या कार्यालयीन
कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते 11 या वेळेत एक तास श्रमदान करण्यात येणार आहे.
या मोहिमेत जालना
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालयीन परिसर स्वच्छ
ठेवणे, अनावश्यक कागदपत्रांची योग्य विल्हेवाट लावणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये
स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेंतर्गत अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी आपले टेबल, खुर्ची, कपाट, संगणक आणि इतर कार्यालयीन साहित्य
स्वच्छ ठेवावे. अनावश्यक व कालबाह्य कागदपत्रे आणि फाईल्सचे शासनाच्या नियमांनुसार
वर्गीकरण करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. तसेच कार्यालयीन आवारातील कचरा,
प्लास्टिक आणि टाकाऊ साहित्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत.
याशिवाय अभिलेख कक्ष,
स्वच्छतागृहे, पेंट्री, वाहनतळ आणि कार्यालयाच्या दर्शनी भागाची स्वच्छता
करण्यावरही भर देण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यालयातील
विविध शाखांमध्ये माहितीफलक आणि घोषवाक्ये लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment