जालना,दि.9(जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळी
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने जालना जिल्ह्यातील
बदनापूर तालुक्यातील नाणेगाव तसेच अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड
परिसरातील शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पाण्याची उपलब्धता, संभाव्य पीक
नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन माहिती घेत पथकाने
दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेतली.
कृषी व शेतकरी कल्याण
विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या
नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे
उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन
व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.
यावेळी आमदार नारायण
कुचे, राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,
निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक
सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा उपायुक्त
पशुसंवर्धन डॉ. प्रशांत चौधरी, बदनापूर उपविभागीय अधिकारी लता बागुल आणि
घनसावंगी-अंबड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी उपस्थित होते.
बदनापूर आणि अंबड
शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी; नुकसानीची घेतली माहिती
केंद्रीय पथकाने
बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथे शेतकरी शिवाजी डोंगरे यांच्या शेतातील करपलेले
सोयाबीन पिकाची पाहणी केली. अंबड तालुक्यातील किणगाववाडी येथे शेतकरी उदल हरीचंद
शिहिरे यांच्या शेतातील करपलेली मोसंबीची झाडे आणि कोरडे पडलेले शेततळे यांची
स्थिती पाहिली. याच परिसरातील शिवलाल गांगे यांच्या शेतातील अदरक पिकाची, तर
बालचंद गांगे यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली.
जामखेड येथे शेतकरी
संतोष गुरुके यांच्या शेतातील बाजरी पिकाची, तसेच गणेश जुंजार यांच्या शेतातील
कोरड्या विहिरीची पाहणी करून पाण्याच्या उपलब्धतेअभावी निर्माण झालेल्या
परिस्थितीची माहिती घेण्यात आली. याशिवाय अंबड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या
गल्हाटी मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांच्या
पाणीपुरवठ्याचा प्रश्न, सिंचनासाठी घटलेली पाण्याची उपलब्धता आणि मच्छीमारीवर
उपजीविका करणाऱ्या 106 कुटुंबाच्या समस्यांची माहिती पथकाने घेतली.तसेच प्रकल्प
परिसरातील उत्तमराव साळुंके यांच्या शेतातील कापूस तसेच अन्य शेतांमधील ऊस
पिकांचीही पाहणी करून पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
नाणेगाव, किणगाववाडी
आणि जामखेड परिसरातील विविध पिकांची पाहणी करताना केंद्रीय पथकाने पिकांची वाढ,
पावसाअभावी झालेली हानी आणि संभाव्य उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची प्रत्यक्ष
माहिती घेतली. खरीप हंगामातील पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पथकाने संबंधित
शेतकऱ्यांशी संवाद साधला. पर्जन्यमान, पावसातील खंड, उपलब्ध पाण्याची स्थिती आणि
त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून
घेण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांनी
पिकांचे झालेले नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता
यांसंदर्भातील अडचणी पथकासमोर मांडल्या. प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या
अनिश्चिततेमुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांची जाणीव करून देत शेतकऱ्यांनी
आपल्या परिस्थितीची माहिती दिली.
कृषी विभागाच्या
अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती आणि
दुष्काळसदृश स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष शेतशिवारातील पाहणी,
पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांशी झालेल्या संवादाच्या आधारे केंद्रीय
आंतरमंत्रालयीन पथक शासनाला परिस्थितीचा अहवाल सादर करणार आहे.
दुष्काळी
परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी
अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून
नुकसानभरपाई, आवश्यक आर्थिक मदत आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रभावी
उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.
-*-*-*-*-*-*-

.jpeg)

.jpeg)


No comments:
Post a Comment