Monday, 19 October 2026

जालना जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून खत विक्रीसाठी FFS प्रणाली अनिवार्य शेतकऱ्यांना आधार क्रमांक, Farmer ID आणि मोबाईल OTP द्वारे करता येणार खत खरेदी; QR कोड किंवा टोकन नंबरचा वापर

 


 

 

जालना, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची विक्री अधिक पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘Framework for Fertilizer Sale’ (FFS) प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून या प्रणालीद्वारे खत विक्री प्रक्रिया राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी या नव्या पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार खत खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांची खरेदी सुलभ, पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या गरजांनुसार करण्यासाठी FFS प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली मोबाईल अ‍ॅपवर आधारित असून, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांत ही प्रणाली लागू केल्यानंतर आता जालना जिल्ह्यासह उर्वरित जिल्ह्यांतही तिची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Farmer ID किंवा आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी

FFS प्रणालीद्वारे खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे Farmer ID उपलब्ध आहे, ते Farmer ID चा वापर करून प्रणालीमध्ये लॉगिन करू शकतील. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP द्वारे पडताळणी केली जाईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध होऊ शकते.

ज्या शेतकऱ्यांकडे Farmer ID उपलब्ध नाही, त्यांना आधार क्रमांकाच्या आधारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार आहे. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली वैयक्तिक माहिती, जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकांची माहिती योग्य प्रकारे नोंदविणे आवश्यक आहे.

 

पिकांच्या क्षेत्रानुसार मिळणार खताची शिफारस

नोंदणी आणि माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ, पिकांचा प्रकार आणि इतर संबंधित माहितीच्या आधारे खतांची शिफारस उपलब्ध होणार आहे. यासाठी अ‍ॅपमध्ये ‘General Fertilizer Recommendation’ (GFR) ही सुविधा देण्यात आली आहे.

 

या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक खताचा प्रकार आणि त्याचे प्रमाण निश्चित करण्यास मदत होईल. त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार खतांचा वापर करणे शक्य होणार असून, अनावश्यक खत खरेदी आणि अतिवापर टाळण्यास मदत होईल.

 

निवडलेल्या खत विक्रेत्याकडून मिळणार QR कोड किंवा टोकन नंबर

FFS प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध पर्यायांमधून खत विक्रेता (Retailer) निवडता येणार आहे. निवडलेल्या विक्रेत्याकडे आवश्यक खत उपलब्ध असल्यास शेतकऱ्यांना खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

 

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना संबंधित विक्रेत्याच्या दुकानात जाऊन अ‍ॅपमधील QR कोड दाखवावा लागेल किंवा प्रणालीतून प्राप्त झालेला टोकन नंबर द्यावा लागेल. त्यानंतर विक्रेता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्याला खत उपलब्ध करून देईल. त्यामुळे खत खरेदीची नोंद डिजिटल पद्धतीने होणार असून, विक्री प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

 

खत खरेदीसाठी तीन दिवसांची मुदत

खत बुकिंग केल्यानंतर QR कोड किंवा टोकन नंबर प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्याने रासायनिक खतांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुकिंग केल्यानंतर निर्धारित मुदतीत निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करावे.

 

शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

FFS प्रणालीचा वापर करताना शेतकऱ्यांनी पुढील बाबींची काळजी घ्यावी :

 

मोबाईलमध्ये ‘Framework for Fertilizer Sale’ हे अ‍ॅप डाउनलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

Farmer ID उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा. Farmer ID नसल्यास आधार क्रमांकाच्या आधारे अर्ज करावा.आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक कार्यरत असल्याची खात्री करावी, जेणेकरून OTP पडताळणी करता येईल.

जमिनीचे क्षेत्रफळ, गाव, पिकांचा प्रकार आणि इतर माहिती अचूक भरावी.

अ‍ॅपमध्ये उपलब्ध GFR शिफारशीनुसार आवश्यक खताचा प्रकार आणि प्रमाण निवडावे.

खत विक्रेता निवडल्यानंतर प्राप्त झालेला QR कोड किंवा टोकन नंबर जतन करून ठेवावा.

खत खरेदीसाठी प्रतिनिधी पाठवायचा असल्यास त्याच्या आधार क्रमांकाची व मोबाईल क्रमांकाची आवश्यक माहिती तयार ठेवावी.

QR कोड किंवा टोकन नंबर मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत खत खरेदी करावी.

अ‍ॅप कुठे मिळणार?

‘Framework for Fertilizer Sale’ हे अ‍ॅप केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी हे अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करू शकतात. अ‍ॅपची लिंक पुढीलप्रमाणे आहे :

 

https://play.google.com/store/apps/details?id=com.agristack.fsas

 

जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी FFS प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून खत खरेदीची प्रक्रिया सुलभ आणि नियोजनबद्ध करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, खत विक्रेते तसेच गुणनियंत्रण निरीक्षकांनी शेतकऱ्यांमध्ये या प्रणालीबाबत जनजागृती करावी आणि आवश्यक मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

या उपक्रमामुळे खत विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, खतांच्या वितरणात पारदर्शकता वाढविणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या गरजेनुसार खत खरेदी करण्यास मदत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्या प्रणालीची माहिती घेऊन 22 ऑक्टोबरपासून खत खरेदी करताना FFS प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

 

तालुकास्तरीय मदतीसाठी संपर्क : जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतूर, घनसावंगी आणि अंबड या तालुक्यांसाठी प्रसिद्धीपत्रकात कृषी अधिकारी कार्यालयांतील गुणनियंत्रण निरीक्षक तसेच पंचायत समिती कार्यालयांतील संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून FFS प्रणालीबाबत मार्गदर्शन घ्यावे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment