Monday, 19 October 2026

जालना जिल्ह्यात 23 ऑक्टोबरला मतदान; मतदार केंद्रांवरील तयारीचा आढावा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी

 


 

    जालना,दि.19(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक तयारीला वेग दिला आहे. याच अनुषंगाने जालना तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 2302 येथे जिल्हा औद्योगिक व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयातील खोली क्रमांक 01 मधील मतदान केंद्राची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पाहणी केली.

या पाहणीवेळी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू, उपविभागीय अधिकारी रामदास दौड, उप आयुक्त श्रीमती गायकवाड, तहसीलदार तसेच निवडणूक विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आशिमा मित्तल यांनी मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांची तपासणी केली. यामध्ये पाणी, वीज, शौचालय, बैठक व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि व्यवस्थित पार पडण्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच मतदान केंद्रांवर किमान महत्त्वाच्या सुविधा आणि आवश्यक व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत की नाहीत, याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही या पाहणीदरम्यान देण्यात आले.

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment