जालना,दि.16(जिमाका): जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात
घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत
देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पीक पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत
मिळवून द्यावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा
बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण
कांत कनवारीया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु,
अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे,
निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील ९५४
गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती असून, या गावातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत.
पीकविमा प्रक्रियेतही पारदर्शकता व अचूकता राखण्याच्या सूचना देत, शेतकऱ्यांना पीक
विम्याचा जास्तीत-जास्त लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावा असे निर्देश दिले.
पिण्याच्या
पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर जीपीएस
प्रणालीने नियंत्रण ठेवावे, जलस्रोतांचे पुनर्भरण करावे तसेच नदी-नाल्यांचे
खोलीकरण करावे, असे त्यांनी सांगितले. पाणी वापरात दहा टक्के कपातीच्या आदेशांची
प्रभावी अंमलबजावणी करावी आणि बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळावा,
असेही निर्देश दिले.
जनावरांसाठी
चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा साक्षरता अभियान राबवून मुरघास, हायड्रोपोनिक्स व
अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे. रोजगार हमी योजनेची कामे जलसंधारणाशी
जोडून विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे आणि जलस्रोतांचे पुनर्जीवन यांना प्राधान्य
द्यावे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांवर मानसिक
ताण येऊ नये यासाठी गावपातळीवर समुपदेशन व संवाद उपक्रम राबवावेत. ‘गाव दत्तक
अभियान’ अंतर्गत दुष्काळग्रस्त गावांना मदत देण्याच्या उपक्रमाचे स्वागत केले. शेतकरी व ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून
देण्यासाठी व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत रोजगारनिर्मितीची कामे प्रभावीपणे राबवावीत.
जलसंधारण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि विहिरींची
दुरुस्ती यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार
उपलब्ध करून द्यावा. यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यासोबतच
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.
पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये रिचार्ज
शाफ्ट, बंधारे व नाला खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात
येणार असून, भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यावर
बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी पालकमंत्री श्रीमती
मुंडे यांनी पीक पंचनामे, जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा, टँकरद्वारे पाणीपुरवठा,
चारा उपलब्धता, रोजगार हमी योजना आणि शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा आढावा
घेतला. बैठकीस संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment