Thursday, 15 October 2026

कोजागरी पौर्णिमेनिमित्त जालना शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी 25 ऑक्टोबर रोजी वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

 


 

जालना,दि.15 (जिमाका) : कोजागरी पौर्णिमेनिमित्त जालना शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांची सुरक्षितता राखली जावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जालना शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

 

रविवार, दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी कोजागरी पौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी शहरातील रस्त्यांवर नागरिकांची व वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवजड वाहनांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी काही प्रमुख मार्गांवरील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी हा आदेश काढला आहे. त्यानुसार दि. 25 ऑक्टोबर रोजी रात्री 12.1 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत संबंधित मार्गांवरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

चार मार्गांवरील वाहतुकीत बदल

जालना-अंबड-वडिगोद्री-शहागड मार्ग : या मार्गाने बीडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक जालना-गोलापांगरी-छत्रपती शिवाजी महाराज चौक-अंबड मार्गे पाचोड-वडिगोद्री-शहागड मार्गाने बीडकडे वळविण्यात येणार आहे.

घनसावंगी-अंबड-जालना मार्ग : घनसावंगी येथून अंबडमार्गे जालन्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुतगिरणी चौफुली, घनसावंगी, राणीउंचेगाव फाटा तसेच अंबड परिसरातील निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक वळविण्यात येणार आहे.

घनसावंगी-अंबड-शहागड मार्ग : घनसावंगी येथून अंबडमार्गे शहागडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सुतगिरणी चौफुली-घनसावंगी-तिर्थपुरी-सुखापुरी-वडिगोद्री मार्गे शहागडकडे वळविण्यात येणार आहे.

पाचोड-अंबड-घनसावंगी मार्ग : पाचोडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळील राणी उंचेगाव फाटा मार्गे घनसावंगीकडे जाण्याचा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

संबंधित मार्गांवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीत 25 ऑक्टोबर रोजी रात्री 12.01 ते रात्री 12 वाजेपर्यंत बदल लागू राहणार आहे. त्यामुळे ट्रक, मालवाहू वाहने आणि इतर अवजड वाहनांच्या चालकांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment