जालना,
दि.19 (जिमाका) : शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी जालना येथील सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या
वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून, स्पॉट अॅडमिशन नोंदणीसह ऑनलाइन अर्ज भरणे आणि
अर्ज छाननीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी संधी उपलब्ध झाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचे सुधारित
वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे अधिकृत संकेतस्थळ
काही तांत्रिक कारणांमुळे तीन दिवस बंद असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे पत्रकात
नमूद करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत
सुधारित
वेळापत्रकानुसार, स्पॉट अॅडमिशन नोंदणीची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12
वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. स्पॉट अॅडमिशनमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 19 ते 23 ऑक्टोबर 2026 या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत संधी
देण्यात आली आहे. तसेच, पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी 19 ते 30 ऑक्टोबर
2026 या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज प्रक्रिया
पूर्ण करावी
स्पॉट अॅडमिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, त्यांनी
विलंब न करता ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित शासकीय वसतिगृहात जमा करावी, असे
आवाहन करण्यात आले आहे. पोर्टलवर नवीन माहिती अद्ययावत झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी
संकेतस्थळ उघडल्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी की-बोर्डवरील Ctrl + F5 ही कळ एकत्र दाबून
पेज रिफ्रेश करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांची स्पॉट अॅडमिशनमध्ये अद्याप नोंदणी झालेली नाही,
त्यांनी ज्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे, त्या वसतिगृहाच्या गृहपालांशी किंवा
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 20 ऑक्टोबर 2026 पूर्वी संपर्क
साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश रद्द केल्यास स्वाधार योजनेचा
लाभ मिळणार नाही
शासकीय
वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश
मिळाला नाही, तर त्यांच्या अर्जाचा विचार नियमानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेसाठी केला जाऊ शकतो. मात्र, वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतर स्वतःहून प्रवेश
रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे पत्रकात स्पष्ट
करण्यात आले आहे.
त्यामुळे
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठीचा
अर्ज विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे. स्पॉट अॅडमिशनसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली
जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अर्ज
भरताना कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
सर्व विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया
पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment