स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना मिळणार बाजारपेठ; नागरिकांना थेट खरेदीची संधी
जालना,दि.22(जिमाका): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार वस्तू थेट उत्पादकांकडून खरेदी करता याव्यात, यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने जालन्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 2 व 3 नोव्हेंबर 2026 रोजी जुना जालना येथील उड्डाणपुलाजवळील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनात घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, कपडे, दागिने तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत. अमृतच्या लक्षित गटातील स्थानिक महिला उद्योजिका, लघुउद्योजक आणि नवउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व थेट विक्री करण्यासाठी या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, उद्योजकांच्या विक्रीत वाढ करणे आणि ग्राहक व उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण करणे, हा प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिल्यास उद्योजकांना आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.तरी जालना शहरासह परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,अमृत संस्था यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
-------
No comments:
Post a Comment