खाजगी आस्थापना, उद्योग व कार्यालयांना निवडणूक विभागाच्या सूचना
जालना,दि.22(जिमाका) : 05-औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026
रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा,
यासाठी खाजगी आस्थापना, उद्योग, संस्था आणि कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या
मतदारांना मतदानासाठी किमान चार तासांची विशेष सवलत द्यावी, अशा सूचना निवडणूक
विभागाने दिल्या आहेत.
औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदान शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार
आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देण्याचे
आवाहन संबंधित आस्थापना व कार्यालयांना करण्यात आले आहे. यासंदर्भात जालना येथील
उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना
देण्यात आल्या आहेत.
लोकप्रतिनिधित्व
अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-ब नुसार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र मतदारांना
भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन
विभागाने २३ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर निवडणुकीत मतदान करणाऱ्या
मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजेबाबत तरतूद केली आहे. मात्र, खाजगी आस्थापनांमध्ये
काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी संबंधित आस्थापनांनी
विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
खाजगी
आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी वेळ मिळावा, यासाठी संबंधित
आस्थापनांना किमान चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात, असे
निवडणूक विभागाने कळविले आहे. यापूर्वीही या संदर्भात संबंधित विभागांना
पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्य निवडणूक अधिकारी,
महाराष्ट्र राज्य यांच्या 16 ऑक्टोबर 2026 रोजीच्या पत्रानुसार दोन तासांऐवजी चार
तासांची विशेष सवलत देण्याबाबत पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील
सर्व संबंधित खाजगी आस्थापना, उद्योग, संस्था आणि कार्यालयांनी या सूचनांची
अंमलबजावणी करून पदवीधर मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून द्यावा, असे
आवाहन करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment