Thursday, 22 October 2026

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र परिसरात निर्बंध लागू-*अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश


मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, ध्वनिक्षेपक व प्रचार साहित्यावर बंदी


जालना, दि.22 (जिमाका) : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू राहणार आहेत.

या आदेशानुसार मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप आणि दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, फेरीवाले आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर खासगी वाहनांना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करता येणार नाही. मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना हा निर्बंध लागू राहणार नाही.

मतदान केंद्र परिसरात ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविणे आणि मिरवणुका काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात संबंधित पक्षांचे किंवा उमेदवारांचे चिन्ह प्रदर्शित करणे आणि निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी व मतदानासाठी आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना वैध ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपकावरून पोलिसांमार्फत आदेशाची प्रसिद्धी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी व संबंधितांनी या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

-------

No comments:

Post a Comment