जालना,दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हास्तरीय गट-क सामायिक प्रतीक्षासूचीतील उमेदवारांचा मेळावा शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदांनुसार ज्येष्ठतेच्या आधारे पाच उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली.
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील ग्राम महसूल अधिकारी, लिपिक-टंकलेखक आणि वाहनचालक या संवर्गातील रिक्त पदे अनुकंपा नियुक्तीद्वारे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी पदाचे एक, लिपिक-टंकलेखक पदाची तीन आणि वाहनचालक पदाचे एक, अशी एकूण पाच रिक्त पदे उपलब्ध होती. या पदांसाठी पात्र उमेदवारांची ज्येष्ठतेनुसार निवड करण्यात आली.
निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, उपलब्ध रिक्त पदांपेक्षा जास्त उमेदवार उपलब्ध असल्याने उर्वरित उमेदवारांना पुढील रिक्त पदांनुसार अनुकंपा नियुक्तीची संधी देण्यात येणार आहे.
या मेळाव्यास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment