Monday, 26 October 2026

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी; अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

 







 

छत्रपती संभाजीनगर, दि. 26 (विमाका) : विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

 

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी होणार आहे. विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी आज मतमोजणी केंद्राला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलांची मांडणी, स्ट्राँग रूम, मतपेट्यांची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतमोजणीच्या फेऱ्या, निकाल संकलन व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

 

मतमोजणीसाठी 70 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, प्राथमिक मतमोजणीच्या 13 फेऱ्यांचे नियोजन आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व दोन सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक सात टेबलांवर एका सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मतपत्रिकांचे वर्गीकरण, वैध व अवैध मतांचा निर्णय, पसंतीक्रमानुसार मतांची नोंद तसेच निकालपत्रकांची पडताळणी करताना विशेष दक्षता घ्यावी. मतमोजणीदरम्यान कोणतीही शंका अथवा अडचण उद्भवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

 

मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीद्वारे देखरेख, प्रवेश नियंत्रण व आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.

 

यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच टेबलनिहाय कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी दिले.

 

-*-*-*-*-*-

Friday, 23 October 2026

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यात एकुण 61.14 टक्के मतदान


जालना, दि.23 (जिमाका) : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात शुक्रवार, (दि.23) रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातील 89 मतदान केंद्रावर एकूण  61.14 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

 

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातील 89 मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये जालना तालुक्यात 53.82 टक्के तर बदनापुर तालुक्यात 57.25 टक्के, अंबड तालुक्यात 65.65 टक्के घनसावंगी तालुक्यात 66.23 टक्के, परतुर तालुक्यात 70.76 टक्के,मंठा तालुक्यात 56.50 टक्के, भोकरदन तालुक्यात 63.69 टक्के आणि जाफ्राबाद तालुक्यात 58.22 टक्के तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन, जालना जिल्ह्यात 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकुण 61.14 टक्के मतदान झाले आहे.

-*-*-*-*-*-*-

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची मतदान केंद्रास भेट

 








जालना,दि.23(जिमाका): 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 करीता आज सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रियेस शांत वातावरणात सुरुवात झाली. त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जालना जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रास भेट देवून मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जालना शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालय, चरण पहेलवान (सी.पी.) भक्त महाविद्यालय येथे तसेच भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिपोरा बाजार आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव रेणुकाई येथील मतदान केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून मतदान प्रक्रिया योग्य पध्दतीने होत असल्याची पाहणी केली. तसेच मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेची माहिती जाणुन घेतली.

यावेळी पोलिस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, जालना तहसिलदार धैर्यशिल गवळी, भोकरदन तहसिलदार ज्ञानेश्वर काकडे यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात 7 लाख 44 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट

 




      जालना, दि.23 (जिमाका) : जालना जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 27 ऑक्टोबर रोजी बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या दिवशी गोळ्या घेता न आलेल्या बालकांसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.

        या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 19 वर्षे वयोगटातील 4 लाख 32 हजार 738 ग्रामीण भागातील बालकांना, तर शहरी भागातील 2 लाख 37 हजार 39 व मनपा जालना येथील 74 हजार 653 य बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात एकूण 7 लाख 44 हजार 426 बालकांना गोळ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

        जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरातील जंतांमुळे रक्तक्षय, कुपोषण आणि शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वयानुसार जंतनाशक गोळ्या देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

        या मोहिमेचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी ताई यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 4 हजार 84 मनुष्यबळाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

      पालकांनी 1 ते 19 वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन , असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा


 

स्त्री ही स्वतंत्र आहे तिला सर्व प्रकारचे मानवी अधिकार मिळाले पाहिजेत, म्हणून महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-पुरुषांच्या मानवी हक्कांचा “सार्वजनिक सत्यधर्म” पुस्तकात प्रामुख्याने उल्लेख केला आहे. हे हक्क पुढीलप्रमाणे आहेत -

 निर्मिककर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले. स्त्री-पुरुष हे उभयताच जन्मतःच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र आहेत.

Thursday, 22 October 2026

पदवीधर मतदारांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत द्या

 


खाजगी आस्थापना, उद्योग व कार्यालयांना निवडणूक विभागाच्या सूचना

 

जालना,दि.22(जिमाका) : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खाजगी आस्थापना, उद्योग, संस्था आणि कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानासाठी किमान चार तासांची विशेष सवलत द्यावी, अशा सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदान शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देण्याचे आवाहन संबंधित आस्थापना व कार्यालयांना करण्यात आले आहे. यासंदर्भात जालना येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-ब नुसार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र मतदारांना भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजेबाबत तरतूद केली आहे. मात्र, खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी संबंधित आस्थापनांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी वेळ मिळावा, यासाठी संबंधित आस्थापनांना किमान चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निवडणूक विभागाने कळविले आहे. यापूर्वीही या संदर्भात संबंधित विभागांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या 16 ऑक्टोबर 2026 रोजीच्या पत्रानुसार दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व संबंधित खाजगी आस्थापना, उद्योग, संस्था आणि कार्यालयांनी या सूचनांची अंमलबजावणी करून पदवीधर मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

****

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट



 

जालना, दि. 22 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज आंबा (ता. परतूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे भेट देऊन विद्यालयातील व्यवस्थेची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर रामेश्वर रेंगे तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पवार उपस्थित होते.

 

विद्यालयात मागील काळात रॅगिंगसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मित्तल यांनी प्राचार्य श्री. पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. रॅगिंगसारखे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, विद्यालयातील रॅगिंगविरोधी समिती सक्रिय ठेवावी, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी तसेच वसतिगृहांवर सातत्याने देखरेख ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनानेही दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांना दिल्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा व त्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण मिळणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

विद्यालयाच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेत, विद्यालयास नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होईल यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यालय परिसरात सुरू असलेल्या नवीन विद्यार्थी वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाच्या दर्जात कोणतीही कसूर राहणार नाही याची काळजी घ्यावी, दर्जेदार साहित्याचा वापर करून काम विहित मुदतीत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदारास दिल्या.

 

****