Thursday, 17 September 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



जालना(जिमाका),दि.17: मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सर्वश्रीमती मनिषा दांडगे, सुकेशनी पगारे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

जिल्हा परिषदेत मानवी रांगोळीद्वारे ‘सेवा संकल्प अभियान’ ची सुरुवात शुभारंभ

 




 

जालना(जिमाका),दि.17 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर 'सेवा संकल्प अभियान' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ या देशव्यापी जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात आज येथील जिल्हा परिषदेत मानवी साखळी व रांगोळी उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारीया, परिविक्षाधीन अधिकारी आर. रंगामंजू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी राधाकिसन राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राष्ट्रीय प्रतिके आणि विकसित भारताची संकल्पना या विषयावर आधारीत मानवी रांगोळीचा उपक्रम राबविला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातुन 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जालना जिल्ह्यात जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर 'सेवा सेतू शिबिरे' आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणे, कार्यालयांमधील प्रलंबित कामांचा गतीने निपटारा करणे, 'नाविन्यपूर्ण संकल्पना' मांडण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंज, 'सेवा माझे योगदान', स्वच्छता मोहीम आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमास कार्यकारी अभियंता जंजाळ, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, गटविकास अधिकारी ऋषिकेश टेकाळे, सहायक गटविकास अधिकारी गजानन पाखरे, संपर्क अधिकारी भगवान तायड यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

अपघातप्रवण स्थळांवरील सुरक्षा कामे तातडीने पूर्ण करा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणांना निर्देश

 


 

जालना(जिमाका),दि.17: जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांवरील (ब्लॅक स्पॉट) रस्ता सुरक्षा उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित यंत्रणांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि.16 रोजी आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर कोल्हे, सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यकारी विभाग 2 चे कार्यकारी अभियंता व्यं.ना. मिठ्ठेवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक निरिक्षक आ. अ. सोनवणे, विद्युत अभियंता के.बी. गावंडे, पोलीस निरिक्षक सुरेश उणवणे आदींची उपस्थिती होती.   

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणल्या की, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसावा, यासाठी आवश्यक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्यातील विविध ब्लॅक स्पॉटवर सुरू असलेल्या तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील 26 अपघातप्रवण स्थळांवर फ्लड लाईट बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 व 2 यांनी अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तातडीने सादर करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अपघातप्रवण ठिकाणांच्या परिसरातील विहिरींच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी विहिरींभोवती आवश्यक सुरक्षा उपाययोजनांसाठी अंदाजपत्रक तयार करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

स्पीड ब्रेकर, सूचना फलक बसविणे, विविध ठिकाणी नवीन स्पीड ब्रेकर बसविणे, खराब झालेले स्पीड ब्रेकर बदलणे, आवश्यक ठिकाणी नवीन स्पीड ब्रेकर उभारणे, रस्ता सुरक्षा सूचना फलक बदलणे आणि कॅट आय बसविण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एचवरील काजळा फाटा तसेच इतर अपघातप्रवण ठिकाणी कॅट आय, स्पीड ब्रेकर आणि आवश्यक रस्ता सुरक्षा साधने बसविण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

अंबड चौफुली, देऊळगाव राजा रोड, बदनापूर रोड, मोतीबाग बायपास आणि इंदेवाडी ते मंठा मार्गावरील रस्ता सुरक्षा उपाययोजनांवरही चर्चा झाली. आवश्यक ठिकाणी रम्बल स्ट्रिप, काँक्रीट बॅरिअर, स्पीड ब्रेकर तसेच दिशादर्शक व सूचना फलक बसविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

काही अपघातप्रवण ठिकाणी पथदिवे नसणे किंवा उपलब्ध प्रकाश व्यवस्था बंद असल्याने रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. विशेषतः इंद्रायणी हॉटेल, चंदनझीरा परिसरातील प्रकाश व्यवस्था आणि वीजपुरवठ्याच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तर काही ठिकाणी विद्युत विभागाच्या डीपी आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी असल्याने संबंधित यंत्रणांनी विद्युत विभागाशी समन्वय साधून स्वतंत्र डीपी उपलब्ध करून घेण्यासाठी कार्यवाही करावी, तसेच प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच काही ब्लॅक स्पॉटवरील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, वीज वितरण कंपनी आणि इतर संबंधित यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून रस्ता सुरक्षा उपाययोजनांची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.

मागील बैठकीत निर्देश देऊनही काही कामे अद्याप प्रलंबित असल्याचे आढळून आले. ही कामे तातडीने पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अंबड चौफुलीच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. चौफुली परिसरातील वाहतूक आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व अपघातप्रवण स्थळांवरील सुरक्षा उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. खराब सुरक्षा साधने बदलणे, प्रकाश व्यवस्था सुधारणे, योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर व रम्बल स्ट्रिप बसविणे, सूचना फलक आणि कॅट आय बसविणे तसेच विहिरींच्या ठिकाणी सुरक्षा उपाय करणे याबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

-*-*-*-*-*-

केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

     जालना दि. 17 (जिमाका) :- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  नायब तहसीलदार, सतिश तायडे, यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.            

यावेळी सहायक महसुल अधिकारी दिपाली राऊत (वानखडे), गजानन खांडेभराड, शिवाजी खांडेभराड, राधकिसन सानप, ज्ञानेश्वर गोरे, पांगरकर, सुनिल काळुंके आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

जिल्हा व सत्र न्यायालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

 


जालना,दि.17(जिमाका) :  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मृदूला भाटिया यांच्या हस्ते ध्वजारोहण साजरे करण्यात आले तद्पूर्वी जालना तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.पी. दिवाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी‍ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एन.एस. शेख, श्रीमती बी.एस. गारे, आर. बी. पारवेकर, वर्षा निहलानी, जी. आर. ढेपे, सदस्य सचिव नितेश बंडगर, मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. पाडोळीकर, न्यायाधीश ए. आर. नागोरी, न्यायाधीश एच. वाय. कावले,  ज्येष्ठ विधिज्ञ ॲड विनायकराव चिटणीस, ॲड स्वप्नील खराबे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड बाबासाहेब इंगळे, सहायक जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड जयश्री बोराडे, ॲड भारत खांडेकर, ॲड अशोक मते, ॲड दिपक कोल्हे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड परमेश्वर गडगीळे, उपाध्यक्ष ॲड अशोक वाहूळकर, सचिव विनोद कुलकर्णी, सह सचिव ॲड शिवनाथ जऱ्हाड, ॲड अरविंद मुरमे आदिंसह जिल्हा वकील संघाचे सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तसेच यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या रक्तदान शिबीरातील 102 रक्तदात्यांपैकी प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटप व आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

-*-*-*-*-*-*-

 

Wednesday, 16 September 2026

*पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम*


जालना,दि.16 (जिमाका): राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे गुरुवार, दि. 17 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन. सकाळी 8.35 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथुन हुतात्मा स्मारक, टाऊन हॉल, जुना जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.50 ते 8.55 वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना मानवंदना देतील. सकाळी 9.00 ते 10.30 वाजता टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण व तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. सकाळी 10.45 वाजता जालना येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

****

*प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून नाव नसल्यास नमुना क्रमांक 6 भरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन*


जालना,दि.16 (जिमाका) : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - 2026 कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर मतदार ओळखपत्र क्रमांक, वैयक्तिक माहिती किवा मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून शोध घेता येईल. तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक 6 भरा. प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव नसल्यास तसेच नवीन मतदार म्हणून नोंदणी करावयाची असल्यास नमुना क्रमांक 6 (घोषणापत्रासह) भरावा. हा अर्ज नागरिकांना voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ECINET मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन करता येईल. तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा संबंधित BLO यांच्याकडे ऑफलाइन अर्ज सादर करता येईल,

अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम

मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, खालील दिवशी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. सर्व मतदान केंद्रे, सर्व तहसिल कार्यालये, शाळा व कॉलेजेस येथे विशेष शिबिरांचे पुढील प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 19 सप्टेंबर 2026, रविवार 20 सप्टेंबर 2026,शनिवार 26 सप्टेंबर 2026,रविवार 27 सप्टेंबर 2026 या विशेष मोहिमेदरम्यान नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रावर अथवा नियुक्त BLO यांच्याकडे संपर्क साधून मतदार नोंदणीसाठी अर्ज करावा.

मतदारांनी आजच आपले नाव तपासावे

मतदार यादीत नाव असणे ही मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने "प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा", तसेच नाव नसल्यास विहित नमुन्यात अर्ज करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे. मतदार नोंदणी मतदार यादीतील नाव शोधणे किंवा अन्य माहितीसाठी मतदार मदत क्रमांक 1800 22 1950 वर संपर्क साधता येईल.


****