Friday, 11 September 2026

जालन्यातील भोकरदनमध्ये अवैध मद्यासह ७२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त


- अवैध मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

- आतापर्यंत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, ७३ गुन्हे दाखल


जालना, दि. ११ (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भोकरदन कार्यालयाने अवैध मद्य विक्री विरोधात विशेष मोहीम राबवून आज सकाळी केलेल्या कारवाईत १७.२८ बल्क लिटर देशी दारू आणि एक दुचाकी वाहन असा एकूण ७२ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एक गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी अहिरे यांनी दिली. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दि. ६ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहिम राबवून आतापर्यंत एकूण ७३ गुन्हे नोंदविले. या कारवाईत ७० जणांना अटक करण्यात आली असून ४ लाख ६५ हजार ९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचे श्रीमती अहिरे यांनी कळविले आहे.


**

*उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार*

*जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती*



जालना,दि.11(जिमाका) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले श्री. मनोज जरांगे पाटील यांना काल गुरुवारपासून आज शुक्रवार सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार करण्यात असून सकाळपासून त्यांच्या प्रकृतीला आराम पडला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. काल सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना तीन सलाईन देण्यात आली. काल रात्री ११.३० वाजता श्री. जरांगे यांनी तीव्र डोकेदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली. संयुक्त वैद्यकीय पथकाने तत्काळ तपासणी करून त्यांना औषधे दिली. त्यानंतर देखभालीचा भाग म्हणून पहाटे साडेचारपर्यंत आणखी एक सलाईनद्वारे आयव्ही फ्ल्यूड देण्यात आले. सध्या श्री. जरांगे पाटील यांना कोणतीही तक्रार नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते.


****


Thursday, 10 September 2026

जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

- मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन

- प्राप्त अर्जांपैकी ९९.९ टक्के अर्ज मंजूर; एकही अर्ज प्रलंबित नाही

- महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन

- अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार

 

जालना,दि.10(जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने केलेल्या अभिलेख तपासणीत जालना जिल्ह्यात एकूण ५ हजार २७ नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे जिल्ह्यात प्राप्त १८ हजार २९५ अर्जांपैकी १८ हजार २७६ अर्ज मंजूर करून जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मंजूर अर्जांचे प्रमाण ९९.९ टक्के आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या १५ मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे श्री. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा-कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासन व जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षांत केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सामाजिक सलोखा कायम राखण्यावर भर

महाराष्ट्र हे प्रगतिशील, आधुनिक आणि विकासाभिमुख राज्य आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मतभेद टाळून शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करावे. मानवता ही प्रत्येकाची पहिली ओळख असली पाहिजे. जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारी दैनंदिन प्रार्थना करत आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी आणि उपचारांसाठी वैद्यकीय पथक चोवीस तास कार्यरत आहे. त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. शासनाने विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून, उर्वरित प्रकरणांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक प्रशासकीय कार्यवाही निर्धारित कायदेशीर प्रक्रियेतच पूर्ण करावी लागते. त्यामुळे श्री. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी केले.

श्रीमती मित्तल म्हणाल्या की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. परिसरातील मद्यबंदी पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. अंतरवाली सराटी गावातील शाळा, अंगणवाडी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

अर्ज नामंजूर होण्याचे प्रमाण नगण्य

श्रीमती मित्तल म्हणाल्या की, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने केलेल्या अभिलेख तपासणीनंतर प्राप्त नोंदीच्या आधारे प्राप्त १८ हजार २९५ अर्जांपैकी १८ हजार २७६ अर्ज मंजूर केले असून उर्वरित १९ अर्जांमध्ये इतर जिल्ह्यांतील पुरावे असल्याने ते नामंजूर करण्यात आले. अर्ज नामंजूर होण्याचे प्रमाण केवळ ०.१ टक्का आहे. सध्या जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वितरणासाठी एकही अर्ज प्रलंबित नाही. तालुकानिहाय मंजूर अर्जांमध्ये जालना तालुक्यात १ हजार ३४०, बदनापूर १ हजार ४३६, अंबड ३ हजार १८५, घनसावंगी ५४०, भोकरदन ६ हजार ३१८, जाफ्राबाद ९९४, परतूर २ हजार ४१८ आणि मंठा तालुक्यात २ हजार ४५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

 

हैदराबाद गॅझेटिअरनुसार ३७७ प्रमाणपत्रांचे वितरण

दि. २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे जिल्ह्यात एकूण ४२१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३७७ अर्ज मंजूर करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर ४४ अर्ज नामंजूर करण्यात आले. या प्रक्रियेतील एकही अर्ज सध्या प्रलंबित नाही.

समितीच्या तपासणीत आढळलेल्या सर्व नोंदी आणि नोंदींची यादी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवरही संबंधित याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

 

महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरे

पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी दि. १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये आवश्यक पुराव्यांसह कागदपत्रे सादर करून पात्र नागरिकांनी अर्ज करावा, असे आवाहन श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.

आज दि. १० सप्टेंबर रोजी जालना जिल्‍हयातील देवमुर्ती,सावंगी तलाव (जालना), बदनापूर,(बदनापूर) , अंबड (अंबड) , कुंभार पिपळगाव , राणी उंचेगाव (घनसावंगी), आष्‍टी, (परतूर) ,पांगरी गोसावी (मंठा), आन्‍वा, दानापूर, पिंपळगाव रेणूकाई (भोकरदन) ,माहोरा(जाफ्राबाद) अशा एकुण १२ महसूल मंडळात शिबीर आयोजीत करण्‍यात आलेले आहे. सदर  शिबीरात आतापर्यंत   22 अर्ज प्राप्‍त झाल्‍याबाबत प्राथमिक माहिती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पात्र नागरिकांनी उपलब्ध नोंदी तपासून आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांसह विशेष शिबिरांमध्ये अथवा संबंधित तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.

 

एसईबीसी आरक्षणांतर्गत ३५ हजार ९८१ प्रमाणपत्रे

जालना जिल्ह्यात मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के एसईबीसी आरक्षणानुसार वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत एकूण ३५ हजार ९८१ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये २०२४ मध्ये १० हजार ३५, २०२५ मध्ये १६ हजार १८० आणि २०२६ मध्ये ९ हजार ७६६ प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

तालुकानिहाय जालना येथे ५ हजार १७५, बदनापूर ३ हजार २०, भोकरदन ७ हजार ७५, जाफ्राबाद ३ हजार ५४१, परतूर ५ हजार ३००, मंठा ३ हजार ४००, अंबड ४ हजार ६४८ आणि घनसावंगी तालुक्यात ३ हजार ८२२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

जात पडताळणीची १ हजार १६ प्रकरणे वैध

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण १ हजार ६६४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार १६ प्रकरणे वैध ठरविण्यात आली आहेत. २३ प्रकरणे अवैध ठरली असून, आवश्यक पुरावे व त्रुटींची पूर्तता न केल्याने १३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सध्या ४९२ अर्ज पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत. त्यापैकी ४७३ अर्ज ९० दिवसांच्या आतील, तर १९ अर्ज ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीतील आहेत. प्रलंबित प्रकरणांचा नियमानुसार लवकरात लवकर निपटारा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन

कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भातील नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ०२४८२-२२३१३२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिले.

विद्यार्थी व युवकांसाठी शासनाचे विविध निर्णय

शासनाने ७ सप्टेंबर रोजी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थी आणि युवकांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी राज्यस्तरावर २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परदेशी शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण शुल्क थेट संबंधित विदेशी विद्यापीठांना अदा करण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तसेच १ ऑक्टोबरपासून मराठा-कुणबी समाजातील १ हजार ४४० युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून एक हजारांपेक्षा अधिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

****

 

 

 

जालना जिल्ह्यात अवैध कारवायांविरोधात धडक मोहीम

 आरटीओ, उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई; 10.96लाखांचा दंड, अवैध दारूसह ट्रॅक्टर जप्त

जालना,दि.10(जिमाका):  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर अवैध दारू व वाळू वाहतुकीवरही कारवाई करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. 169 वाहनांची तपासणी करून 59 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ओव्हरलोड, विनापरवाना वाहतूक, विना-PUC, रिफ्लेक्टर नसणे, सीटबेल्ट न लावणे तसेच विना-HSRP नंबर प्लेट आदी नियमभंगाचा समावेश आहे. या कारवाईत जागेवर 5 लाख 6 हजार 500 रुपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला. तसेच प्रलंबित ई-चलानपोटी 81 हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला. त्यामुळे एकूण 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी छापे टाकून 9 गुन्हे दाखल करत 9 आरोपींना अटक केली. या कारवाईत 46.44 लिटर अवैध देशी दारू, 45 लिटर हातभट्टी दारू आणि 200 लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 36  हजार 200 रुपये आहे.

महसूल विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांवर कारवाई केली. भोकरदन तालुक्यातील राजूर नाका येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह पकडण्यात आला.

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये 36 जणांवर तर कलम 129 अन्वये 7 जणांवर, तर इतर कायद्यांतर्गत एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. एकूण 44 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक खटले दाखल करण्यात आले. जिल्ह्यात अवैध वाहतूक, दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

****

*तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल; जिल्ह्यातील 101 शाळा तंबाखूमुक्त*


जालना,दि.10(जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) जिल्हा रुग्णालय अंतर्गत जालना जिल्ह्यात 'तंबाखूमुक्त शाळा' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाला शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत जिल्ह्यातील 101 शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निर्धारित निकष पूर्ण केले असल्याचे जिल्हा रुग्णालय जालना यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये तंबाखूविरोधी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये तंबाखूमुक्त शाळेसाठी निर्धारित 9 निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांचा आढावा घेऊन त्यांना तंबाखूमुक्त करण्यात येत आहे. यासाठी 10 ते 16 ऑगस्ट 2026 दरम्यान प्रथम जिल्हास्तरीय सर्व तालुका शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व विस्तारअधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन, यामध्ये शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर व विक्री होणार नाही याची दक्षता, तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करणारे फलक, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, तंबाखूमुक्तीची शपथ तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग यासारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये 'तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार' हा संदेश पोहोचविण्यात येत आहे. शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रम, शपथविधी तसेच तंबाखूविरोधी संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी एप्रिल 2026 ते आजपर्यंत 101 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून हा उपक्रम येथेच थांबणार नसून पुढील काळात जिल्ह्यातील आणखी शाळांचा तंबाखूमुक्त शाळा अभियानात समावेश करण्यात येणार आहे. संबंधित शाळांना निर्धारित निकषांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.

तंबाखूचे सेवन सुरू होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, 'तंबाखूमुक्त शाळा - तंबाखूमुक्त परिसर तंबाखूमुक्त पिढी' या संकल्पनेच्या दिशेने जालना जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भावी पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.


*****



*आमची अंगणवाडी आमची जबाबदारी या संकल्पनेवर आधारित 9 व्या राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन*


जालना,दि.10(जिमाका) : महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि जिल्हा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुपोषित बालक, निरोगी माता आणि सक्षम समाज’ हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असून यंदा ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवरीया यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत अंगणवाडी व्यवस्थापन समित्या अधिक सक्रिय करून अंगणवाडी केंद्रांमधील स्वच्छता, आहाराचा दर्जा आणि स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, 3 ते 3 ० वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत नियोजनबद्ध गृहभेटी घेऊन पालकांना बालसंगोपन, आरोग्य आणि पोषणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

बालकांच्या आहारात पुरेशा प्रथिनांचा समावेश, विविध अन्नगटांचा वापर आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्नपदार्थांचा वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रमांतर्गत ताजे, विविध प्रकारचे व गरम शिजवलेले भोजन उपलब्ध करून देण्याबरोबरच साप्ताहिक मेनूमध्ये विविधता, स्वच्छता आणि आहाराच्या गुणवत्तेची हमी यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

नव्याने गठित अंगणवाडी व्यवस्थापन समित्या तसेच SNP मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून पोषणविषयक उपक्रमांमध्ये समुदायाचा सहभाग, मालकीभाव आणि उत्तरदायित्व वाढविण्यात येणार आहे. प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षण (ECCE) कार्यक्रमांतर्गत बालकांचा संज्ञानात्मक विकास आणि पुरेसे पोषण हे परस्परपूरक घटक असल्याचे अधोरेखित करण्यात येणार आहे.

मातृ वंदना योजनेची विशेष मोहीम

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र महिलांना योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष कागदपत्र पूर्तता व नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच महिला मेळावे, माताबैठका, रॅली, पथनाट्य, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतही पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय पोषण माह अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, लोकप्रतिनिधी, स्वयं-सहायता बचत गट तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया यांनी केले आहे.


*****



*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*



जालना,दि.10(जिमाका) : महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, एकल पालक असलेली बालके, दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके, कैद्यांची मुले, दिव्यांग, अंध तसेच मतिमंद बालकांना बाल कल्याण समितीच्या शिफारशीनुसार दरमहा 2 हजार 250 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

या योजनेच्या पात्रतेच्या अटी व शर्ती तसेच सविस्तर माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

अर्जदारांनी अर्ज कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीमार्फत सादर करू नये. अर्ज स्वतः जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळमजला, जालना येथे अथवा संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा तालुका संरक्षण अधिकारी, पंचायत समिती/तालुका कार्यालय येथे सादर करता येईल.

या योजनेसाठी कार्यालयाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. योजना पूर्णपणे मोफत असून, अर्ज प्रक्रिया किंवा योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊ नयेत. लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी कार्यालयाची राहणार नसल्याची सूचना करण्यात आली आहे.

त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थ्यांनी कोणत्याही मध्यस्थाच्या भूलथापांना बळी न पडता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


*****