Friday, 11 September 2026

पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करा - आढावा बैठकीत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश

 

'नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा असे काम करा

 


मुंबई, दि. ११ जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून करून देण्यासाठी सर्वसमावेश आराखडा तयार करावा. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील पाचशे शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज दिले. नवीन वर्षात नवी शाळा’

 या संकल्पनेसह राज्याने आदर्श घ्यावा असे काम करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

   पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा पुन्हा एकदा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यापूर्वीही १ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेऊन सूचना केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शाळांचा सर्वेकरून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. आज त्यावर चर्चा करून त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

 

शाळांचा निधी जागरूकतेने खर्च करा

---------

शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विकासकामांचा दर्जाही उत्तम राखावा. जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, उत्तम परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार कामांवर भर द्यावा. जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा गुणवत्तेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

नवीन वर्षात नवी शाळा

----------

 ‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी अभियान स्वरूपात काम करावे. शाळांच्या विकासकामांबाबत पुढील आढावा बैठक आपण स्वतः जालना येथे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचाही आढावा घेतला. या योजनांसाठी उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन ती गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

****

जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रशासनाची कारवाई

 गौण खनिज, दारू विक्री, वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; वाळूसाठा अवैध दारु व मुद्देमाल जप्त

 

जालना,दि.11(जिमाका): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह अवैध वाळू उत्खनन व वाहतूक, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने संयुक्तपणे धडक मोहीम राबविली. या मोहिमेत गौण खनिज विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली.

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात आली. परतूर तालुक्यातील रोहिणा बु. येथे कारवाई करून अवैध 12 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मंठा तालुक्यातील इंचा परिसरात कारवाई करून सुमारे 40 ते 50 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.

अवैध दारू विक्री व साठवणुकीविरोधात जिल्ह्यात एकूण 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. अंबड-शहागड रोड, जालना शहरातील विविध परिसर, खरपुडी तसेच भोकरदन परिसरातील हॉटेल्स, पत्री शेड व घरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अवैध देशी दारू, 15 लिटर हातभट्टी दारू आणि 200 लिटर रसायन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत 41 हजार 880 रुपये आहे. या प्रकरणांत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 128 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली. ओव्हरलोड वाहतूक, विनापरवाना वाहन चालविणे, पीयुसी नसणे, रिफ्लेक्टर, सीटबेल्ट तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसणे आदी नियमभंग आढळून आले. या कारवाईत जागेवर वसूल केलेला दंड रु. 1, 78, 000 तर बजावलेले ई-चलान (प्रलंबित दंड) रु. 48, 000 असून, एकूण दंडाची रक्कम रु. 2, 26, 000इतकी आहे.

तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असुन, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. कलम 126 अंतर्गत 1 कारवाई तर  कलम 129 अंतर्गत 1 कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

****

जालना जिल्हा जनगणना हस्तपुस्तिकेचे काम पूर्ण


जालना,दि.11(जिमाका): जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जिल्हा जनगणना हस्तपुस्तिका (District Census Handbook–D.C.H.B.) तयार करण्याचे काम पूर्ण झाल्याचे जिल्हा निवडणुक जनगणना अधिकारी यांनी कळविले आहे.

जनगणना 2027 अंतर्गत दि. 16 ऑगस्ट 2026 ते दि. 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात जिल्हा जनगणना हस्तपुस्तिका संकलनाचे काम करण्यात आले. या हस्तपुस्तिकेत जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात येतो. जनगणना हस्तपुस्तिका हे जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचे अधिकृत दस्तऐवजीकरण करणारे महत्त्वाचे साधन मानले जाते.

हस्तपुस्तिकेमध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या, भौगोलिक व सामाजिक वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन, विविध शासकीय योजना राबविणे तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. भारताच्या जनगणना कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात हे काम नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात आले असून, त्यासाठी जिल्ह्यातील एकूण 872 क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामात सहकार्य केले. यात ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी 10 सप्टेंबर, 2026 पर्यंत मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 964 गावांची तसेच 03 नगरपालिका आणि 05 नगरपंचायत क्षेत्रातील माहिती संकलीत करण्याचे 100 टक्के काम पूर्ण केले. जनगणना हस्तपुस्तिकेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरातील माहिती संकलित करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम केले. या माहितीच्या आधारे जिल्हा जनगणना हस्तपुस्तिकेचे काम पूर्ण करण्यात आले.


****


*जालना जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी तिसरी यादी जाहीर*


*जिल्ह्यातील 862 गावांतील पात्र शेतकऱ्यांचा समावेश*


जालना,दि.11(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत जालना जिल्ह्यातील थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवार (दि. ११) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 862 गावातील 25 हजार 847 पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.

अनियमित पर्जन्य, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि हवामान बदलामुळे शेती व्यवसायासमोर निर्माण झालेल्या अडचणी, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे.

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रतिशेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा यामध्ये समावेश आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेल्या पात्र कर्जांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गावपातळीवर यादी उपलब्ध

तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित गावातील गावचावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखेत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यादीतील शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन लवकरात-लवरकत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकास कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. प्रमाणीकरणावेळी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकीची आढळल्यास त्याबाबत ऑनलाइन तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यासाठी सेवा केंद्र चालकास सांगावे.

तसेच, आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे उमटत नसल्यास त्याबाबतची ऑनलाइन तक्रार तहसीलदारांकडे करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेशी संपर्क साधावा

यादीतील शेतकरी मयत असल्यास त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि कर्जखात्यावर वारसाचे नाव नोंदवून घ्यावे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना श्री. विष्णू रोडगे यांनी केले आहे.


****


कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात जालना जिल्ह्यात आतापर्यंत १२६ अर्ज प्राप्त



जालना, दि. ११ (जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळस्तरावर १२ शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण १२६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.


तालुकानिहाय प्राप्त अर्जांमध्ये जालना तालुक्यातील दोन शिबिरांत १३, बदनापूरमधील एका शिबिरात १०, अंबडमधील एका शिबिरात २, घनसावंगीतील दोन शिबिरांत २०, भोकरदनमधील तीन शिबिरांत ५३, जाफराबादमधील एका शिबिरात १६, परतूरमधील एका शिबिरात ६ आणि मंठा तालुक्यातील एका शिबिरात ६ अर्जांचा समावेश आहे.

प्राप्त १२६ अर्जांपैकी समितीअंतर्गत ७८, तर गॅझेटअंतर्गत ४८ अर्ज आहेत. काही प्रस्तावांची ऑनलाइन प्रक्रिया बाकी असून, उर्वरित प्रकरणांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी कळविले आहे.

*उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक संपन्न*


जालना,दि.11(जिमाका): राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ साठी जालना जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे 10 सप्टेंबर 2026 रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा देशपांडे, जालना यांच्या अध्यक्षेत पार पडली.

या बैठकीत शासनाने दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या निर्देशांनुसार आगामी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडळांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची मंडळे निवडण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत समितीमध्ये चर्चा झाली.

यावेळी बैठकीस नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तथा सदस्य सचिव शिवाजी गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकणी, जिपच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री, गजानन पडूळ, संपदा कुलकर्णी आदीची उपस्थिती होती.

समितीने गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांचा विचार करून शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे परीक्षण करण्याबाबत चर्चा केली.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, महिला व युवकांचा सहभाग तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचा प्रभावी माध्यम म्हणून साजरा व्हावा, यासाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांची जिल्हास्तरावर निवड करून त्यांची शिफारस करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हास्तरीय निवड समितीने संबंधित मंडळांच्या कामकाजाचे शासनाच्या निकषांनुसार मूल्यमापन करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची मंडळे निश्चित करावीत व त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.


****


जालन्यात रंगणार दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सव’

 

 15 व 16सप्टेंबर रोजी जे.ई.एस. महाविद्यालयात लोकसंगीताची सुरेल मेजवानी; विविध लोककलावंतांचे सादरीकरण






 

जालना,दि.11(जिमाका): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंगीत परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जालना येथे दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 15 सप्टेंबर आणि बुधवार, दि. 16  सप्टेंबर 2026 रोजी सायं. 5.30 वाजता जे.ई.एस. महाविद्यालय, जालना येथे हा महोत्सव होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार, दि. 15 सप्टेंबर रोजी विनल देशमुख, रमानंद उगळे, अश्विनी मिठे आणि शाहीरा माधवी माळी यांच्या लोकसंगीत व लोककलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तर बुधवार, दि. 16 सप्टेंबर रोजी श्रावणी महाजन, कुणाल वरळे, सानिका शिर्के आणि चेतन लोखंडे हे कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांना लोकसंगीताची सुरेल अनुभूती देणार आहेत.

 

महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि लोकजीवनाशी घट्ट नाते असलेल्या लोकसंगीतामध्ये विविध भागांतील परंपरा, बोलीभाषा, जीवनशैली, सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटते. या समृद्ध लोकपरंपरेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नव्या पिढीला महाराष्ट्राच्या लोकसंगीताची ओळख व्हावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकसंगीत, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून जालना व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडकर यांनी केले आहे.

 

****

जालन्यातील भोकरदनमध्ये अवैध मद्यासह ७२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त


- अवैध मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

- आतापर्यंत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, ७३ गुन्हे दाखल


जालना, दि. ११ (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भोकरदन कार्यालयाने अवैध मद्य विक्री विरोधात विशेष मोहीम राबवून आज सकाळी केलेल्या कारवाईत १७.२८ बल्क लिटर देशी दारू आणि एक दुचाकी वाहन असा एकूण ७२ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एक गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी अहिरे यांनी दिली. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दि. ६ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहिम राबवून आतापर्यंत एकूण ७३ गुन्हे नोंदविले. या कारवाईत ७० जणांना अटक करण्यात आली असून ४ लाख ६५ हजार ९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचे श्रीमती अहिरे यांनी कळविले आहे.


**

*उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार*

*जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती*



जालना,दि.11(जिमाका) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले श्री. मनोज जरांगे पाटील यांना काल गुरुवारपासून आज शुक्रवार सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार करण्यात असून सकाळपासून त्यांच्या प्रकृतीला आराम पडला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. काल सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना तीन सलाईन देण्यात आली. काल रात्री ११.३० वाजता श्री. जरांगे यांनी तीव्र डोकेदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली. संयुक्त वैद्यकीय पथकाने तत्काळ तपासणी करून त्यांना औषधे दिली. त्यानंतर देखभालीचा भाग म्हणून पहाटे साडेचारपर्यंत आणखी एक सलाईनद्वारे आयव्ही फ्ल्यूड देण्यात आले. सध्या श्री. जरांगे पाटील यांना कोणतीही तक्रार नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते.


****


Thursday, 10 September 2026

जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

- मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन

- प्राप्त अर्जांपैकी ९९.९ टक्के अर्ज मंजूर; एकही अर्ज प्रलंबित नाही

- महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन

- अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार

 

जालना,दि.10(जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने केलेल्या अभिलेख तपासणीत जालना जिल्ह्यात एकूण ५ हजार २७ नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे जिल्ह्यात प्राप्त १८ हजार २९५ अर्जांपैकी १८ हजार २७६ अर्ज मंजूर करून जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मंजूर अर्जांचे प्रमाण ९९.९ टक्के आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या १५ मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे श्री. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा-कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासन व जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षांत केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सामाजिक सलोखा कायम राखण्यावर भर

महाराष्ट्र हे प्रगतिशील, आधुनिक आणि विकासाभिमुख राज्य आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मतभेद टाळून शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करावे. मानवता ही प्रत्येकाची पहिली ओळख असली पाहिजे. जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारी दैनंदिन प्रार्थना करत आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी आणि उपचारांसाठी वैद्यकीय पथक चोवीस तास कार्यरत आहे. त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. शासनाने विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून, उर्वरित प्रकरणांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक प्रशासकीय कार्यवाही निर्धारित कायदेशीर प्रक्रियेतच पूर्ण करावी लागते. त्यामुळे श्री. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी केले.

श्रीमती मित्तल म्हणाल्या की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. परिसरातील मद्यबंदी पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. अंतरवाली सराटी गावातील शाळा, अंगणवाडी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

अर्ज नामंजूर होण्याचे प्रमाण नगण्य

श्रीमती मित्तल म्हणाल्या की, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने केलेल्या अभिलेख तपासणीनंतर प्राप्त नोंदीच्या आधारे प्राप्त १८ हजार २९५ अर्जांपैकी १८ हजार २७६ अर्ज मंजूर केले असून उर्वरित १९ अर्जांमध्ये इतर जिल्ह्यांतील पुरावे असल्याने ते नामंजूर करण्यात आले. अर्ज नामंजूर होण्याचे प्रमाण केवळ ०.१ टक्का आहे. सध्या जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वितरणासाठी एकही अर्ज प्रलंबित नाही. तालुकानिहाय मंजूर अर्जांमध्ये जालना तालुक्यात १ हजार ३४०, बदनापूर १ हजार ४३६, अंबड ३ हजार १८५, घनसावंगी ५४०, भोकरदन ६ हजार ३१८, जाफ्राबाद ९९४, परतूर २ हजार ४१८ आणि मंठा तालुक्यात २ हजार ४५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

 

हैदराबाद गॅझेटिअरनुसार ३७७ प्रमाणपत्रांचे वितरण

दि. २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे जिल्ह्यात एकूण ४२१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३७७ अर्ज मंजूर करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर ४४ अर्ज नामंजूर करण्यात आले. या प्रक्रियेतील एकही अर्ज सध्या प्रलंबित नाही.

समितीच्या तपासणीत आढळलेल्या सर्व नोंदी आणि नोंदींची यादी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवरही संबंधित याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

 

महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरे

पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी दि. १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये आवश्यक पुराव्यांसह कागदपत्रे सादर करून पात्र नागरिकांनी अर्ज करावा, असे आवाहन श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.

आज दि. १० सप्टेंबर रोजी जालना जिल्‍हयातील देवमुर्ती,सावंगी तलाव (जालना), बदनापूर,(बदनापूर) , अंबड (अंबड) , कुंभार पिपळगाव , राणी उंचेगाव (घनसावंगी), आष्‍टी, (परतूर) ,पांगरी गोसावी (मंठा), आन्‍वा, दानापूर, पिंपळगाव रेणूकाई (भोकरदन) ,माहोरा(जाफ्राबाद) अशा एकुण १२ महसूल मंडळात शिबीर आयोजीत करण्‍यात आलेले आहे. सदर  शिबीरात आतापर्यंत   22 अर्ज प्राप्‍त झाल्‍याबाबत प्राथमिक माहिती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पात्र नागरिकांनी उपलब्ध नोंदी तपासून आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांसह विशेष शिबिरांमध्ये अथवा संबंधित तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.

 

एसईबीसी आरक्षणांतर्गत ३५ हजार ९८१ प्रमाणपत्रे

जालना जिल्ह्यात मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के एसईबीसी आरक्षणानुसार वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत एकूण ३५ हजार ९८१ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये २०२४ मध्ये १० हजार ३५, २०२५ मध्ये १६ हजार १८० आणि २०२६ मध्ये ९ हजार ७६६ प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

तालुकानिहाय जालना येथे ५ हजार १७५, बदनापूर ३ हजार २०, भोकरदन ७ हजार ७५, जाफ्राबाद ३ हजार ५४१, परतूर ५ हजार ३००, मंठा ३ हजार ४००, अंबड ४ हजार ६४८ आणि घनसावंगी तालुक्यात ३ हजार ८२२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

जात पडताळणीची १ हजार १६ प्रकरणे वैध

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण १ हजार ६६४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार १६ प्रकरणे वैध ठरविण्यात आली आहेत. २३ प्रकरणे अवैध ठरली असून, आवश्यक पुरावे व त्रुटींची पूर्तता न केल्याने १३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सध्या ४९२ अर्ज पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत. त्यापैकी ४७३ अर्ज ९० दिवसांच्या आतील, तर १९ अर्ज ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीतील आहेत. प्रलंबित प्रकरणांचा नियमानुसार लवकरात लवकर निपटारा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन

कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भातील नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ०२४८२-२२३१३२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिले.

विद्यार्थी व युवकांसाठी शासनाचे विविध निर्णय

शासनाने ७ सप्टेंबर रोजी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थी आणि युवकांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी राज्यस्तरावर २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परदेशी शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण शुल्क थेट संबंधित विदेशी विद्यापीठांना अदा करण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तसेच १ ऑक्टोबरपासून मराठा-कुणबी समाजातील १ हजार ४४० युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून एक हजारांपेक्षा अधिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

****

 

 

 

जालना जिल्ह्यात अवैध कारवायांविरोधात धडक मोहीम

 आरटीओ, उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई; 10.96लाखांचा दंड, अवैध दारूसह ट्रॅक्टर जप्त

जालना,दि.10(जिमाका):  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर अवैध दारू व वाळू वाहतुकीवरही कारवाई करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. 169 वाहनांची तपासणी करून 59 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ओव्हरलोड, विनापरवाना वाहतूक, विना-PUC, रिफ्लेक्टर नसणे, सीटबेल्ट न लावणे तसेच विना-HSRP नंबर प्लेट आदी नियमभंगाचा समावेश आहे. या कारवाईत जागेवर 5 लाख 6 हजार 500 रुपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला. तसेच प्रलंबित ई-चलानपोटी 81 हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला. त्यामुळे एकूण 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी छापे टाकून 9 गुन्हे दाखल करत 9 आरोपींना अटक केली. या कारवाईत 46.44 लिटर अवैध देशी दारू, 45 लिटर हातभट्टी दारू आणि 200 लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 36  हजार 200 रुपये आहे.

महसूल विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांवर कारवाई केली. भोकरदन तालुक्यातील राजूर नाका येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह पकडण्यात आला.

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये 36 जणांवर तर कलम 129 अन्वये 7 जणांवर, तर इतर कायद्यांतर्गत एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. एकूण 44 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक खटले दाखल करण्यात आले. जिल्ह्यात अवैध वाहतूक, दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

****

*तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल; जिल्ह्यातील 101 शाळा तंबाखूमुक्त*


जालना,दि.10(जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) जिल्हा रुग्णालय अंतर्गत जालना जिल्ह्यात 'तंबाखूमुक्त शाळा' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाला शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत जिल्ह्यातील 101 शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निर्धारित निकष पूर्ण केले असल्याचे जिल्हा रुग्णालय जालना यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये तंबाखूविरोधी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये तंबाखूमुक्त शाळेसाठी निर्धारित 9 निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांचा आढावा घेऊन त्यांना तंबाखूमुक्त करण्यात येत आहे. यासाठी 10 ते 16 ऑगस्ट 2026 दरम्यान प्रथम जिल्हास्तरीय सर्व तालुका शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व विस्तारअधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन, यामध्ये शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर व विक्री होणार नाही याची दक्षता, तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करणारे फलक, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, तंबाखूमुक्तीची शपथ तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग यासारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये 'तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार' हा संदेश पोहोचविण्यात येत आहे. शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रम, शपथविधी तसेच तंबाखूविरोधी संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी एप्रिल 2026 ते आजपर्यंत 101 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून हा उपक्रम येथेच थांबणार नसून पुढील काळात जिल्ह्यातील आणखी शाळांचा तंबाखूमुक्त शाळा अभियानात समावेश करण्यात येणार आहे. संबंधित शाळांना निर्धारित निकषांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.

तंबाखूचे सेवन सुरू होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, 'तंबाखूमुक्त शाळा - तंबाखूमुक्त परिसर तंबाखूमुक्त पिढी' या संकल्पनेच्या दिशेने जालना जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भावी पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.


*****



*आमची अंगणवाडी आमची जबाबदारी या संकल्पनेवर आधारित 9 व्या राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन*


जालना,दि.10(जिमाका) : महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि जिल्हा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुपोषित बालक, निरोगी माता आणि सक्षम समाज’ हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असून यंदा ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवरीया यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत अंगणवाडी व्यवस्थापन समित्या अधिक सक्रिय करून अंगणवाडी केंद्रांमधील स्वच्छता, आहाराचा दर्जा आणि स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, 3 ते 3 ० वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत नियोजनबद्ध गृहभेटी घेऊन पालकांना बालसंगोपन, आरोग्य आणि पोषणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

बालकांच्या आहारात पुरेशा प्रथिनांचा समावेश, विविध अन्नगटांचा वापर आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्नपदार्थांचा वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रमांतर्गत ताजे, विविध प्रकारचे व गरम शिजवलेले भोजन उपलब्ध करून देण्याबरोबरच साप्ताहिक मेनूमध्ये विविधता, स्वच्छता आणि आहाराच्या गुणवत्तेची हमी यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

नव्याने गठित अंगणवाडी व्यवस्थापन समित्या तसेच SNP मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून पोषणविषयक उपक्रमांमध्ये समुदायाचा सहभाग, मालकीभाव आणि उत्तरदायित्व वाढविण्यात येणार आहे. प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षण (ECCE) कार्यक्रमांतर्गत बालकांचा संज्ञानात्मक विकास आणि पुरेसे पोषण हे परस्परपूरक घटक असल्याचे अधोरेखित करण्यात येणार आहे.

मातृ वंदना योजनेची विशेष मोहीम

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र महिलांना योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष कागदपत्र पूर्तता व नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच महिला मेळावे, माताबैठका, रॅली, पथनाट्य, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतही पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय पोषण माह अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, लोकप्रतिनिधी, स्वयं-सहायता बचत गट तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया यांनी केले आहे.


*****



*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*



जालना,दि.10(जिमाका) : महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, एकल पालक असलेली बालके, दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके, कैद्यांची मुले, दिव्यांग, अंध तसेच मतिमंद बालकांना बाल कल्याण समितीच्या शिफारशीनुसार दरमहा 2 हजार 250 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

या योजनेच्या पात्रतेच्या अटी व शर्ती तसेच सविस्तर माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

अर्जदारांनी अर्ज कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीमार्फत सादर करू नये. अर्ज स्वतः जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळमजला, जालना येथे अथवा संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा तालुका संरक्षण अधिकारी, पंचायत समिती/तालुका कार्यालय येथे सादर करता येईल.

या योजनेसाठी कार्यालयाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. योजना पूर्णपणे मोफत असून, अर्ज प्रक्रिया किंवा योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊ नयेत. लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी कार्यालयाची राहणार नसल्याची सूचना करण्यात आली आहे.

त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थ्यांनी कोणत्याही मध्यस्थाच्या भूलथापांना बळी न पडता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


*****



*सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी संसाधन व्यक्तींची नोंदणी*

*जालना जिल्ह्यातील इच्छुक पात्र व्यक्तींना 17 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी*


जालना,दि.10(जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जालना जिल्ह्यात सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी संसाधन व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींनी 17 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. राज्य नोडल एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी संसाधन व्यक्तींची नोंदणी करण्यात येत आहे.

या पदासाठी सर्व प्रकारच्या पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. तसेच अन्नप्रक्रिया प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. अन्नप्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान विकास, नवीन उत्पादन विकसित करणे, गुणवत्तेचे निकष, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आदी बाबींमध्ये सल्ला देण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मिळणार आहे. संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.

लाभार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान उद्योगांचा विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक बाबी, उत्पादन विकास, अन्न सुरक्षा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि बँक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत पात्र वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल 10 लाख रुपये अनुदान मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अन्नप्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संसाधन व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अर्ज कुठे करावा ?

इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बचत भवन, मोतीबाग समोर, जालना येथे 17 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावेत. योजनेची अधिक माहिती PMFMEच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी केले आहे.


*****


*स्वाधार योजना, शासकीय वसतिगृह प्रवेशात बनावट कागदपत्रे आढळल्यास कारवाई*


जालना,दि.10(जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तसेच शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने काही विद्यार्थी खोटी, बनावट अथवा फेरफार केलेली कागदपत्रे सादर करीत असल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अर्जांची आणि प्रकरणांची सखोल तपासणी करण्यात येणार असून, कागदपत्रे बनावट अथवा खोटी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

स्वाधार योजना किंवा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी बनावट भाडेकरारनामा, खोटे बोनाफाईड प्रमाणपत्र, बनावट वसतिगृह प्रमाणपत्र, खोटी उपस्थिती, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज अथवा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्याने यापूर्वी स्वाधार योजनेचा किंवा शासकीय वसतिगृहाचा लाभ घेतला असल्यास तो लाभ नियमानुसार रद्द करून शासनाकडून अदा करण्यात आलेली रक्कम वसूल केली जाणार आहे. प्रकरणाच्या स्वरूपानुसार संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाईही करण्यात येईल.

स्वाधार योजना किंवा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरताना इंटरनेट कॅफे अथवा ऑनलाइन सेवा केंद्र चालकांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटी माहिती अपलोड करणे, बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणे किंवा विद्यार्थ्यांना शासनाची फसवणूक करण्यास जाणीवपूर्वक मदत करणे आढळल्यास संबंधित कॅफे चालक, मालक किंवा व्यक्तीविरुद्धही नियमानुसार कठोर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

याशिवाय अशा गैरप्रकारात कोणतीही व्यक्ती, संस्था, महाविद्यालयीन अधिकारी किंवा कर्मचारी अथवा इतर संबंधित व्यक्ती सहभागी असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास, त्यांच्या भूमिकेनुसार संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृहाच्या योजनांचा लाभ केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच शासनाच्या नियमानुसार मिळावा, यासाठी प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करताना केवळ खरी, वैध आणि अधिकृत कागदपत्रेच सादर करावीत. बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बनावट कागदपत्रे सादर करणारे विद्यार्थी तसेच अशा गैरप्रकारास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही दयामाया न दाखविता नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे.


****


*विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण - डॉ. विद्या पटवारी*

जालना,दि.10(जिमाका) : माय भारत जालना, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार वश्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत यंग लीडर डायलॉग (VBYLD) क्विझ स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, जालना येथील मयूरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. विद्या पटवारी, जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे, प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र अहिरराव, उपप्राचार्य पूजा कक्कड, कार्यक्रम अधिकारी प्रा. पार्वती देशमुख तसेच डॉ. सुधाकर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रा. डॉ. विद्या पटवारी यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत यंग लीडर डायलॉग (VBYLD) उपक्रमाची माहिती दिली. देशाच्या विकास प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, युवकांमध्ये नेतृत्वगुण, ज्ञान, निर्णयक्षमता आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मयूरकुमार गोरमे यांनी स्पर्धेचे महत्त्व स्पष्ट करताना युवकांनी अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी आपल्या ज्ञानाचा, कौशल्यांचा आणि कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

क्विझ स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानासोबतच देशाच्या इतिहास, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि विकासविषयक बाबींच्या ज्ञानाला चालना मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी सहकार्य केले.


*****