Friday, 27 November 2026

यंत्रणा सक्षम करून आरोग्य सेवा लोकाभिमुख करा - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा








जालना दि. 27 (जिमाका): राज्य शासनाचा आरोग्य विभाग दर्जेदार, सुलभ आणि मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत असून, त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे आरोग्य सेवा देताना लोकाभिमुख होण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यंत्रणेला दिले.

 

जालना जिल्ह्यात आज आरोग्य संवाद यात्रेत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांच्या पदाधिकारी व अधिका-यांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा परिषदेत संवाद साधला.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, जालना महानगर पालिकेचे आरोग्य व स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी. डी. म्हस्के यांच्यासह वैद्यकीय अधिकारी,  पदाधिकारी उपस्थित होते. 

 

आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, शहरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रांचा आढावा घेताना पीर पिंपळगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र हसनाबाद,  प्राथमिक आरोग्य केंद्र माहोरा, जाफराबाद ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

 

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा लोकाभिमुख, दर्जेदार, सुलभ आणि मोफत मिळाव्यात यासाठी राज्य शासनाचा आरोग्य विभाग कार्यरत असून, ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट सेवा देणे क्रमप्राप्त आहे. मात्र जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तितकीशी गांभिर्याने कार्यरत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र शासन आरोग्य विभाग लोकाभिमुख करण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर राज्य शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारख्या योजना राबवित असून, या योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्व वर्गातील रुग्णांना मोफत तसेच अल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी शासन प्रचंड निधी खर्च करत आहे. त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ व्हावा, असे सांगून 'तिशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला' या 100 दिवसाच्या मोहीमेचा त्यांनी आढावा घेतला. त्यामध्ये 30 वर्षावरील नागरिकांच्या रक्तदाब, कर्करोग, मधुमेह तपासणी करणे अपेक्षित आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा या तपासणीकामी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिले.

माहोरा, जाफराबाद, भोकरदन ग्रामीण रुग्णालय, पीर पिंपळगाव, खासगाव ग्रामीण रुग्णालयांच्या सेवेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना रुग्ण वाहिका, रुग्ण वाहिका चालकांचे वेतन, औषधी भांडार, आरोग्य सुविधा, वास्तू, शासकीय निवासस्थाने, पाणीपुरवठा, रिक्त पदांचाही आढावा घेतला.

 

एचपीव्ही लसीकरण प्रभावीपणे करा - श्री. आबिटकर

दिवसेंदिवस कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून, ते कमी करण्यासाठी वेळेत तपासणी व उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी 14 वर्षे पूर्ण आणि 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ह्युमन पॉपोलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. ही लस घेणा-या मुलींचे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. कर्करोगाची प्रतिबंधात्मक एकमेव लस असून, त्याचा वरील वयोगटातील सर्व मुलींनी लाभ घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी केले. तसेच ही मोहीम प्रभावीपणे न राबविणा-या वैद्यकीय अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महात्मा फुले जन आरोग्य योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, जनतेला मोफत उपचार, रोगनिदान, शस्त्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने यावरही विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडून शहरी आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

-*-*-*-*-*-*-*-*-

                                                                           

No comments:

Post a Comment