Tuesday, 3 November 2026

जालना शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निधी प्रस्ताव तात्काळ सादर करावा-पालकमंत्री पंकजा मुंडे


जालना महानगर पालिकेतील रिक्त पदे भरणारभरुन; कर्मचारी भरतीला गती देण्याचे निर्देश

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नूतनीकृत वाचनालये आणि मोतीबाग ग्लो गार्डनचे लोकार्पण

 





जालना, दि.3 (जिमाका) : दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी  स्त्रोत शोधुन तसेच योग्य नियोजन करावे. तसेच जालना शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. आणि महापालिकेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, असे निर्देश राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

जालना शहर महानगरपालकेतील सभागृहात आयोजित बैठकीत विविध विकासकामे आणि पाणीटंचाईचा आढावा घेतांना पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, महापालिका आयुक्त अंजली शर्मा  यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की,  जालना शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. महापालिकेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यासोबतच आवश्यक अधिकाऱ्यांची मागणी संबंधित विभागांकडे करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी संबंधित मंत्र्यांशी स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

मागणीनुसार पूर्वनिर्मित (प्री-फॅब्रिकेटेड) अंगणवाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि गरजू नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून सोपविलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश ही पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिले.

 

लोकप्रतिनिधींनी मांडल्या शहराच्या विकासासंबंधी मागण्या

 

उपमहापौर राजेश राऊत यांनी रखडलेल्या सौर ऊर्जा आणि सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्पांना गती द्यावी, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अंबड येथील 35 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि महापालिकेतील रिक्त पदांची भरती करावी, अशा मागण्या केल्या. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरुस्ती आणि नवीन जालना भागातील एसआरपीएफ परिसरात उद्यान विकसित करण्याची मागणीही त्यांनी केली. महापौर वंदना मगरे यांनी या मागण्यांना दुजोरा देवून, तथागत गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी केली.

पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या अडचणींकडे लक्ष वेधले. महिला व बालकल्याण सभापती संध्या देठे यांनी अंगणवाड्यांसंदर्भातील प्रस्ताव मांडला. शिक्षण व विद्युत सभापती भाग्यश्री जोगस यांनी पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीच्या प्रस्तावांना मंजुरी व निधी देण्याची मागणी केली. स्वच्छता व आरोग्य सभापती कपिल भुरेवाल यांनी स्वच्छता आणि आरोग्य विभागांसाठी आवश्यक निधीची मागणी केली. विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी केली.

 

 

बैठकीच्या प्रारंभी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील पालकमंत्री श्रीमती मुंडे यांना भेट दिले. महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या विविध विकासकामे आणि पाणीटंचाईची  विभागनिहाय कामकाजाची माहिती दिली.

यावेळी बैठकीस विरोध पक्षनेता यांच्यासह विविध विभागाचे सभापती आणि अधिकारी यांची उपस्थिती होती.

 

*पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते वाचनालय आणि ग्लो गार्डनचे लोकार्पण*

 

राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज जालना शहर महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय आणि हुतात्मा स्मारक वाचनालय या दोन नूतनीकृत वाचनालय आणि मोतीबाग ग्लो गार्डनचे लोकार्पण झाले.

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment