Friday, 27 November 2026

रुग्णालयांच्या इमारतींसोबतच आरोग्य सेवा अधिक दर्जेदार देण्याला प्राधान्य – प्रकाश आबिटकर * घनसावंगी येथील श्रेणीवर्धित 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण; वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यावर भर

 










जालना, दि. 27 (जिमाका) : रुग्णालयांच्या सुसज्ज आणि आधुनिक इमारती उभारण्याबरोबरच तेथे मिळणाऱ्या आरोग्य सेवाही तितक्याच दर्जेदार, लोकाभिमुख आणि रुग्णांना दिलासा देणाऱ्या असणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या इमारतींपेक्षाही तेथील आरोग्य सेवा अधिक देखण्या असाव्यात. यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने काम करून सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

 

घनसावंगी येथील 31 कोटी 25 लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या श्रेणीवर्धित 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना अल्प खर्चात तसेच आवश्यकतेनुसार मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यासाठी आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्यावर शासन भर देत आहे. नवीन इमारती, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ यांची सांगड घालून ग्रामीण रुग्णालये ही खऱ्या अर्थाने आरोग्य मंदिरे बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी 1 हजार 400 वैद्यकीय अधिकारी आणि 1 हजार 900 समुदाय आरोग्य अधिकारी सेवेत दाखल करण्यात येत आहेत. तसेच आंदोलन करणाऱ्या 15 हजार कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. या नियुक्त्यांचा प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी प्रभावी उपयोग झाला पाहिजे. नियुक्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक स्तरावर वास्तव्यास राहून नागरिकांना नियमित आरोग्य सेवा द्यावी. पुढील काळात आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले.

 

राज्यात बुलढाणा, नांदेड, पालघर आणि ठाणे यांसह विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य संस्थांच्या नवनिर्मित इमारतींचे लोकार्पण करण्यात येत आहे. त्याचबरोबर 108 रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध असलेल्या 1 हजार 750 वाहनांपैकी पहिल्या टप्प्यात 350 रुग्णवाहिकांचा संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना अधिक प्रभावीपणे उपचार मिळावेत, यासाठी शासन निर्णयातही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रिक्त पदांची भरती आणि आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी आरोग्यमंत्री म्हणून स्वीकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवांबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने संवेदनशीलतेने काम करावे. संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन आणि आरोग्य विभागाची असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

 

यावेळी खासदार संजय जाधव यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक आणि परिचारिकांची कमतरता तसेच विविध संवर्गांतील रिक्त पदांचा प्रश्न मांडला. आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरल्यास रुग्णांना वेळेवर आणि अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

 

आमदार हिकमत उढाण यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साधेपणाने आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. 31 कोटी 25 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालयाचा घनसावंगी व परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी येथील 46 बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया ठाणे येथे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाकाळ, तीर्थपुरी आणि साष्टे पिंपळगाव येथे रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध असून, तेथील रुग्णालयांच्या बांधकामासह रिक्त पदे आणि आवश्यक पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात घनसावंगी येथील आरोग्य संस्थेचा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 30 खाटांच्या रुग्णालयापर्यंत आणि आता श्रेणीवर्धित 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयापर्यंत झालेला विकासात्मक प्रवास विशद केला.

 

यावेळी हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आठ बालकांचे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू मिसाळ यांनी केले, तर मोहन गोडसे यांनी आभार मानले.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment