Friday, 13 November 2026

दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबाला मिळाला शासनाचा आधार !

 

शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जपले माणुसकीचे नाते

 

भिलपुरीतील अंबादास तांगडे कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण; मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली



 

 

जालना,दि. 13 (जिमाका) : दुष्काळ परिस्थिती, अपुरे शेती उत्पन्न आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे जीवन दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आधार आणि मदतीचा हात दिल्याने संकटग्रस्त कुटुंबांनाही नव्या उमेदीने उभे राहण्याचे बळ मिळू शकते. याचे संवेदनशील उदाहरण जालना तालुक्यातील भिलपुरी येथील अंबादास तांगडे यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून समोर आले आहे.

 

भिलपुरी येथील अंबादास तांगडे यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे. पत्नी मंदाबाई, दोन मुली, एक मुलगा आणि आई अशा सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर अवलंबून आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसमोर निर्माण झालेली आव्हाने आणि मर्यादित उत्पन्न यामुळे कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही कुटुंबाने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपला संसार सुरू ठेवला आहे.

 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना तालूक्यातील भिलपुरी येथील अंबादास तांगडे यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी तांगडे कुटुंबासोबत वेळ घालवला आणि त्यांच्या घरातील पारंपरिक ग्रामीण भोजनाचाही आस्वाद घेतला. शेतकरी कुटुंबातून आलेला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणि वेदनांची आपल्याला जाणीव असल्याचे सांगत, शासन कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

या भेटीदरम्यान तांगडे कुटुंबातील मुलीशी संवाद साधताना तिला भविष्यात पोलीस अधिकारी होण्याची इच्छा असल्याचे समजले. तिच्या या स्वप्नाला बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच भविष्यात तिच्या विवाहाची जबाबदारीही घेण्याची घोषणा केली.

 

आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणाला किंवा त्यांच्या भवितव्याला मर्यादा येऊ नयेत, या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे तांगडे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलीच्या स्वप्नांना शासनस्तरावरून मिळालेला हा पाठिंबा ग्रामीण भागातील इतर कुटुंबांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

 

जालना जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पाच हजार रुपयांची अग्रीम मदत, पीक नुकसानभरपाई, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीला स्थगिती, शैक्षणिक शुल्कात सवलत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.

 

याशिवाय दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांतील मुलींचे विवाह आर्थिक अडचणींमुळे रखडू नयेत, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन, विद्यार्थिनींना सायकली आणि गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा देण्याचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

 

भाऊबीजेच्या निमित्ताने तांगडे कुटुंबातील मंदाबाई यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे औक्षण केले. यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांना कपडे भेट दिले. तांगडे कुटुंबीयांनीही त्यांना ज्वारी, बाजरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आपुलकी व्यक्त केली. शासनातील वरिष्ठ पदावरील व्यक्तीने आपल्या घरी येऊन सुख-दुःखाची विचारपूस केल्याने समाधान वाटत असल्याची भावना अंबादास तांगडे यांनी व्यक्त केली.

 

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबाला केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर मानसिक आधाराचीही गरज असते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भिलपुरीतील तांगडे कुटुंबाच्या भेटीदरम्यान शिक्षण आणि विवाहाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा ही अशाच सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरली आहे. मुलीच्या पोलीस अधिकारी होण्याच्या स्वप्नाला मिळालेला आधार हा तिच्या भविष्यासाठी आशादायी ठरणारा आहे.

 

****

No comments:

Post a Comment