जालना,दि.6(जिमाका) : दिवाळी सणाच्या कालावधीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनी
व वायू प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी
जालना जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यासाठी जिल्हा
व पोलीस ठाणेनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नागरिकांना संबंधित
अधिकाऱ्यांच्या मोबाइल क्रमांकावर, ई-मेलद्वारे तसेच 112 क्रमांकावर तक्रार नोंदविता
येणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर
६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, 10 नोव्हेंबर रोजी दिपावली
पाडवा, सण साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत फटाके फोडताना होणारे ध्वनी व वायू
प्रदूषण, तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही व्यवस्था केली
आहे.
मुंबई
उच्च न्यायालयात दाखल SUO MOTU PIL No. 01/2026, दिनांक 23 सप्टेंबर 2026 मधील निर्देशानुसार
फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने तक्रारी स्वीकारण्यासाठी आणि
त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व पोलीस ठाणेनिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जालना जिल्हा पोलीस प्रशासनाने ही व्यवस्था केली
आहे. याकरीता जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील श्री. भुजंग नामदेव हातमोडे
यांची नोडल अधिकारी म्हणून, नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी मो. क्र. ९१४५४८८०३८ या मोबाइल क्रमांकावर किंवा
sp.jalna@mahapolice.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे.
तसेच
सदर बाजार, जालना तालुका, कदीम जालना, चंदनझिरा, बदनापूर, अंबड, गोंदी, घनसावंगी, तीर्थपुरी,
परतूर, मौजपुरी, मंठा, आष्टी, सेवली, भोकरदन, जाफराबाद, टेंभुर्णी, हसनाबाद व पारध
या पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फटाके
फोडण्याच्या संदर्भात ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत किंवा अन्य संबंधित तक्रारी असल्यास
नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच नोडल अधिकाऱ्यांचे
मोबाइल क्रमांक व ई-मेल पत्ते उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांना 112 या आपत्कालीन
क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात उपस्थित राहूनही तक्रार नोंदविता येणार आहे.
दिवाळीचा सण शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा
व्हावा, ध्वनी व वायू प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी नागरिकांनी नियमांचे
पालन करावे आणि प्रदूषणासंदर्भातील तक्रारी तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात,
असे आवाहन जालना जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment