जालना,दि.6(जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक
वर्ष 2026-27 साठी ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात
येणाऱ्या ‘पीएम यशस्वी प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ योजनांची अर्ज प्रक्रिया
सुरू झाली आहे. या योजनांसाठी विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) तसेच महाडीबीटी
2.0 (MahaDBT 2.0) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत.
प्री-मॅट्रिक
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ज्या मुला-मुलींच्या पालकांचे
वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त
असलेल्या इयत्ता नववी व दहावीतील मुलींनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी
पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील मुलींचे शिष्यवृत्ती अर्जही पूर्वीप्रमाणे
सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर भरता येतील.
याशिवाय
जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधील व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता अशा योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर पूर्ववत भरता
येणार आहेत.
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ओबीसी, एसबीसी
व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज केवळ
एनएसपी पोर्टलवर भरावेत. या योजनांसाठी नवीन अर्ज करण्याची सुविधा महाडीबीटी पोर्टलवर
उपलब्ध राहणार नसल्याची सूचना देण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी
विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश
घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींच्या शिष्यवृत्तीचा समावेश आहे.
महाडीबीटी पोर्टलवर
पूर्ववत अर्ज करता येणाऱ्या योजनांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,
व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता,
ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,
तसेच या तिन्ही प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती
योजनांचा समावेश आहे. शासकीय तसेच खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही
व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेता येणार आहे.
अर्ज व पडताळणीचे वेळापत्रक : एनएसपी पोर्टलवरील
शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज प्रक्रिया १७ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना
30 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्रुटी असलेल्या अर्जांची पडताळणी
तसेच संस्थास्तरावरील पडताळणी 15 डिसेंबर 2026 पर्यंत, तर जिल्हा व संबंधित विभागीय
स्तरावरील पडताळणी 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती
योजनांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा व महाविद्यालयांची नोंदणी एनएसपी
पोर्टलवर झालेली असल्याची खात्री करावी. अन्यथा संबंधित शाळा किंवा महाविद्यालय अर्ज
भरताना यादीत दिसणार नाही. त्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांनी पोर्टलवर आपली नोंदणी
करणे आवश्यक आहे.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment