जालना, दि.13(जिमाका) : जालना शहरातील टांगा स्टँड रोडवरील धनंजय कॉलेजच्या
इमारतीसमोर, सारस्वत क्लिनिकजवळ रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह
आढळून आला आहे. सदर बाजार पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पुढे
येण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११
नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा पुरुष मृतावस्थेत आढळला.
त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृत पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३५
वर्षे, उंची १६६ सेंटीमीटर, रंग सावळा, केस मध्यम काळे, डोळे काळे, चेहरा गोल आणि
मिशी बारीक काळी असल्याचे वर्णन पोलिसांनी दिले आहे. त्याच्या अंगावर फुल
बाह्यांचा शर्ट व फुल पँट होती. तसेच हातावर मराठी अक्षरात 'मुकेश सुरेश लिंगे'
असे गोंदलेले असून, त्याच ठिकाणी इंग्रजीमध्ये 'Mukesh' व 'ॐ' अशी चिन्हे गोंदलेली
आहेत.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात
अकस्मात मृत्यू क्रमांक ५६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४
प्रमाणे १२ नोव्हेंबर २०२६ रोजी नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील
तपास करीत आहेत. सदर मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सदर बाजार पोलीस
ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार आर. सी. कु-हाडे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment