Thursday, 12 November 2026

मत्स्यव्यवसायाच्या 24 योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा महाडीबीटी 2.0 प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 


जालना,दि.12 (जिमाका) : राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासह मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना (CMMSY) अंतर्गत विविध 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी आता महाडीबीटी 2.0 प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

या प्रणालीचा शुभारंभ बुधवार, दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आला.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ, गतिमान, पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांचा लाभ मत्स्यव्यवसायिकांपर्यंत थेट पोहोचणार आहे. तसेच लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात जमा होणार असून अर्ज प्रक्रिया सुलभ होण्यासह कागदपत्रांची संख्या कमी होणार आहे.

 

या ऑनलाइन सुविधेमुळे अर्जांचा जलद निपटारा होऊन मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेता येणार आहे.

 

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी 2.0 च्या अधिकृत https://mahadbt2.maharashtra.gov.in/others या संकेतस्थळाला भेट द्यावी.

-*-*-*-*-*-       

No comments:

Post a Comment