जालना,दि.25 (जिमाका) : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात राज्य
सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना आरक्षित
प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर
करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण
झालेल्या विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र अर्जांची पडताळणी जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत सुरू आहे.
या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांचे जात
वैधता प्रमाणपत्राचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांना
संबंधित समितीमार्फत एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, अनेक
विद्यार्थ्यांनी अद्याप संबंधित समितीशी संपर्क साधून अर्जातील त्रुटींची पूर्तता
केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून आवश्यक
कागदपत्रे व माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी. अर्जातील त्रुटी दूर करण्याची
सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय
विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी
विद्यार्थ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीने केले आहे. अर्जासंदर्भात मदत किंवा मार्गदर्शनासाठी बार्टी
मुख्यालय, पुणे येथील मदत कक्षाच्या 020-2633339 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9404999452
या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच helpdesk@barti.in या ई-मेलवरही
संपर्क साधता येईल.
असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समिती, जालना यांच्या उपाध्यक्ष तथा सदस्य संगीता मकरंद यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment