Monday, 16 November 2026

*निवृत्तीवेतनधारकांसाठी "जीवनप्रमाण" अॅपद्वारे ऑनलाइन हयातीचे दाखले सादर करण्यासाठी विशेष शिबिर*



जालना,दि.16(जिमाका) :जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी १७ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथे "जीवनप्रमाण" अॅपद्वारे ऑनलाइन हयातीचे दाखले सादर करण्याबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये निवृत्तीवेतनधारकांचे ऑनलाइन हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) तयार करून देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात येणार आहे. सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपले आधार कार्ड, पीपीओ क्रमांक आणि बँक खाते पुस्तिका व मोबाईल क्रमांक सोबत आणावा. ऑनलाइन हयात प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया शिबिरामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. ऑनलाइन हयात प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर संबंधित निवृत्तीवेतनधारकांना डिसेंबर २०२६ चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे. ज्या निवृत्तीवेतनधारकांनी दि. ०१ नोव्हेंबरनंतर बँक शाखेत हयात प्रमाणपत्रावर सही केली असेल, त्या निवृत्तीवेतनधारकांनीसुद्धा आपले ऑनलाइन हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथे आयोजित या विशेष शिबिरात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, राजू डोके यांनी केले आहे.


****


No comments:

Post a Comment