जालना,दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण
देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सन २०२६-२७
या वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील १ हजार ३८०
युवकांना १० विविध क्षेत्रांतील २४ अभ्यासक्रमांद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन
करण्यात आले आहे. यामुळे युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्राप्त करून रोजगाराच्या
संधी मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या
बैठकीत जिल्ह्यातील कौशल्य विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन आगामी वर्षातील प्रशिक्षण
उपक्रम आणि रोजगारनिर्मितीबाबत महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले. यावेळी बैठकीस कौशल्य
विकास विभागाचे सहायक आयुक्त जी पी चिमणकर, कौशल्य विकास विभागाचे उप आयुक्त विद्या
शितोळे, मनपा उपआयुक्त नंदा गायकवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एम. एच. केदार,
उद्योजक सुनील रायठठा आदींची उपस्थिती होती.
जालना ड्राय
पोर्टच्या माध्यमातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन लॉजिस्टिक
क्षेत्रातील १८० उमेदवारांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रेशीम उद्योगाला
चालना देण्यासाठी ‘कोकून टू क्लॉथ’ (Cocoon to Cloth) या उपक्रमांतर्गत ४६० उमेदवारांना
प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. या प्रशिक्षणामुळे रेशीम उत्पादनापासून वस्त्रनिर्मितीपर्यंतच्या
विविध प्रक्रियांमध्ये स्थानिक युवकांना कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील
युवकांच्या कौशल्यांचा, रोजगाराच्या गरजांचा आणि उपलब्ध उपजीविकेच्या साधनांचा अभ्यास
करण्यासाठी ‘जालना डिस्ट्रिक्ट स्किल अँड लाईव्हलीहूड सेन्सस’ हा उपक्रम राबविण्याचे
प्रस्तावित आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ७० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात
येणार आहे. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील कौशल्य व रोजगारविषयक गरजांची माहिती संकलित
करून त्यानुसार प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील
युवकांना स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे
आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः
रेशीम उद्योगाच्या विकासातून ‘जालनाई सिल्क’ या ब्रँडला चालना देण्यासह स्थानिक पातळीवर
रोजगारनिर्मितीचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
****


No comments:
Post a Comment