जालना,
दि. 25 (जिमाका): नागरिकांना अधिक
सुलभ, जलद आणि पारदर्शक आधार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या
मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने जालना येथे नवीन अत्याधुनिक आधार सेवा केंद्र
सुरू करण्यात आले आहे. हे आधुनिक आधार सेवा केंद्र नागरिकांसाठी जलद, सोयीस्कर आणि
पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणारे ठरेल. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने
हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नागरिकांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज बुधवारी
या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार
असल्याने नागरिकांना आधारविषयक विविध सेवा मिळणे अधिक सोयीचे होणार आहे. सदरील आधार
सेवा केंद्र हे मनोहर आजळे टॉवर, प्रयाग नगर, नूतन वसाहत, अंबड रोड, जालना येथे सुरू
करण्यात आले आहे. या केंद्रात नवीन आधार नोंदणी, 5 ते 17 वयोगटातील मुलांचे मोफत बायोमेट्रिक
अद्ययावतीकरण, नाव, पत्ता आदी लोकसंख्याशास्त्रीय तपशिलांमधील दुरुस्ती तसेच नागरिकांच्या
तक्रारींचे प्रत्यक्ष निवारण अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या केंद्रात नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी
आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर प्रवेशाची
सुविधा, सुगम स्वच्छतागृहे आणि स्वतंत्र केंद्र व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली
आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सुलभ आणि सोयीस्कर पद्धतीने आधार सेवा मिळण्यास मदत
होणार आहे.
नागरिकांना आधार सेवेसाठी रांगेत थांबण्याची गरज
भासू नये, यासाठी UIDAI च्या https://bookappointment.uidai.gov.in या संकेतस्थळावरून
आगाऊ वेळ निश्चित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच जवळचे आधार सेवा केंद्र शोधण्यासाठी
भुवन आधार पोर्टलचा (https://bhuvan-app3.nrsc.gov.in/aadhaar) वापर करता येणार आहे.
लहान
मुलांच्या डिजिटल ओळखीचे संरक्षण आणि आधारमधील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी शाळांमध्ये
विशेष बायोमेट्रिक अद्ययावतीकरण शिबिरेही आयोजित करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे
आधार अद्ययावतीकरण वेळेत होण्यास मदत होणार आहे.
उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वतः
या केंद्रातील बायोमेट्रिक अद्ययावतीकरण सेवेचा लाभ घेतला. या उद्घाटन सोहळ्यास निवासी
उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, युआयडीएआय मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे सहायक व्यवस्थापक
कुलदीप सिंह गहलोत, आधार सेवा केंद्राचे व्यवस्थापक रवी पवार, प्रोटीयनचे राज्य समन्वयक
विजय सिंह, परिचालन व्यवस्थापक तुकाराम सिंह यांच्यासह केंद्रातील कर्मचारी आणि नागरिक
उपस्थित होते.
एकसमान
सेवा मानके, माहितीची सुरक्षितता आणि वेळेत तक्रार निवारण यांना प्राधान्य देत युआयडीएआयच्या
सेवा भागीदारामार्फत हे केंद्र चालविण्यात येणार आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांना
विश्वासार्ह आणि दर्जेदार आधार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त
नागरिकांनी या सेवा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-*-*-
.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment